|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण महिनाअखेर पूर्ण होणार

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण महिनाअखेर पूर्ण होणार 

शहर प्रतिनिधी/ फलटण

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासंदर्भातील सर्व्हेक्षण सप्टेंबर महिनाअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के.शर्मा यांनी दिली.

सन 1912 मध्ये ब्रिटीशांनी लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्याची योजना आखली होती. सन 1918 मध्ये या योजनेचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला होता. या मार्गाच्या पूर्ततेसाठी सन 1926 मध्ये 327 हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली. लोणंद ते पंढरपूर या प्रस्तावीत मार्गापैकी लोणंद ते फलटण हे 40 किमी. अंतरातील काम पूर्ण झाले. मात्र फलटण ते पंढरपूर हे काम अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले होते. या 105 किमी अंतराच्या मार्गाचे काम झाले पाहिजे अशी जनभावना होती. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी कोणीही भरीव प्रयत्न केले नव्हते. रणजितसिंह मोहिते पाटील यांची राज्यसभेवर निवड झाली आणि संसदेच्या पटलावर प्रथमच त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघातून खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे लोकसभेत गेल्यापासून त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला. स्वातंत्र्यपुर्व काळापासून रेंगाळलेला हा प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे. यासाठी खासदार मोहिते-पाटील सतत रेल्वेमंत्र्यांना भेटत राहिले. निवेदने देऊन पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाचे ट्रफीक सर्व्हेक्शन करण्याचे आदेश दिले होते. 14 जानेवारी 2017 ला सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहिले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंहांनी हा रेल्वेमार्ग झाला पाहिजे अशी मागणी श्री प्रभू यांच्याकडे केली होती. त्यास प्रभू यांनी अनुकुलता दर्शविली होती. त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीनुसार या मार्गाला अर्थसंकल्पात स्थान मिळाले. रेल्वेमंत्र्यांनी 1150 कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी दिली आणि तातडीने 100 कोटी रूपयांची तरतूद केली. त्यामुळे मोहिते पाटील पितापुत्रांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याकरीता या मार्गाचे रविवार दि.11 जून रोजी कराड येथे व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. आता या महिनाअखेरपर्यंत प्रलंबीत राहिलेला फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाचे अंतिम सर्व्हेक्षण पूर्ण होणार असून याचा अंतिम डीपीआर तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यावर रेल्वे बोर्ड टेंडर काढणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

या निर्णयामुळे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Related posts: