|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » नेतृत्वासाठी महिलांनीही पुढे यावे : प्रतिभा पाटील

नेतृत्वासाठी महिलांनीही पुढे यावे : प्रतिभा पाटील 

पुणे / प्रतिनिधी :

देश सुरळीत चालण्यासाठी पुरुषांप्रमाणेच महिलांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे नेतृत्वासाठी महिलांनीही पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

 श्री भवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवीवर्षानिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या पत्नींचा सन्मान ‘स्त्राr शक्ती सन्मान जागर पुरस्कारा’ने करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पं. वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, डॉ. शैलेश गुजर, सचिव अरविंद जडे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते. मानपत्र, साडीचोळी, पुस्तके आणि फळांची परडी देऊन या कर्तृत्ववान स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. वैशाली माशेलकर, अनुराधा संचेती, अनुराधा पवार, शारदा गोडसे, ज्योत्स्ना एकबोटे, नीलीमा देसाई, अंजली परदेशी, ज्योती माडचेड्डी, वर्षा पवार, मनीषा खेडेकर, वैशाली खटावकर, कल्याणी सराफ, अमिता आगरवाल, गीता गोयल, सुशिला मर्लेचा यांचा सन्मान करण्यात आला.

 पाटील म्हणाल्या, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांची परिस्थिती बदलली. स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्त्रियांसाठी झालेल्या कायद्यामुळे आज स्त्रियांच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. देश सुरळीत चालण्यासाठी पुरुषांप्रमाणेच महिलांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे असणाऱया त्यांच्या पत्नींचे कार्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा स्त्रियांना गृहीत धरले जाते. त्यांच्या कामाची गणना होत नाही. तरीही त्या त्याग भावनेने काम करीत असतात. आपलेपणाची भावना स्त्रियांमध्ये आहे. त्यामुळेच कुटुंबाला त्या बांधून ठेवतात. ही आपलेपणाची भावना आणि संस्कार समाजात रुजविले, तर सुसंस्कृत समाज निर्माण होईल.

 पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, कर्तृत्ववान पुरुषांचा सन्मान नेहमीच करण्यात येतो. परंतु त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असणाऱया महिलांचा सन्मानदेखील व्हायला हवा. केवळ पुण्यातच नव्हे; तर देशभर हा कार्यक्रम व्हावा आणि पुणे महानगरपालिकेने स्त्राr शक्ती जागर हा कार्यक्रम पालिकेतर्फे राबवावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

 पुरस्काराला उत्तर देताना ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, स्त्रियांचा सन्मान ही भारताची परंपरा आहे. स्त्रिया या मुळातच बुद्धीमान असतात. सर्व क्षेत्रात त्या आज पुढे गेल्या आहेत. त्यामुळे अशा महिलांचा सन्मान केल्याबद्दल अतिशय आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार उल्हास पवार यांनी आभार मानले.

Related posts: