|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘ग्रीन’ रिफायनरी सांगून जनतेची फसवणूक!

‘ग्रीन’ रिफायनरी सांगून जनतेची फसवणूक! 

राजापुरात आलेल्या अभ्यासकांचा आरोप

प्रकल्पाच्या गंभीर परिणामांची ‘स्लाईड शो’व्दारे माहिती

प्रतिनिधी /राजापूर

जगातील कुठलीही रिफायनरी हरीत नसते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील 14 गावांमध्ये होऊ घातलेली रिफायनरी ‘ग्रीन’ असूच शकत नाही. किंबहुना शासन ‘ग्रीन’ हा शब्द वापरून येथील भोळय़ाभाबडय़ा जनतेच्या डोळय़ात धूळफेक करत असल्याचा आरोप रिफायनरी प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगण्यासाठी आलेल्या अभ्यासकांनी केला. यावेळी त्यांनी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे होणाऱया गंभीर परिणामांची जाणीव ‘स्लाईड शो’द्वारे करून दिली.

राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावांमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला सध्या जोरदार विरोध केला जात आहे. गावागावात रिफायनरी विरोधात बैठकांवर बैठका आयोजित केल्या जात असून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापुरात कोकण विनाशकारी रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने रिफायनरीपासून होणाऱया दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी एका ‘स्लाईड शो’चे आयोजन केले होते. त्यामध्ये या प्रकल्पामुळे भविष्यात कसे दुष्परिणाम होतील, त्याची माहिती दिली.

यावेळी सर्वस्वी राजेंद्र फातर्पेकर, सचिन चव्हाण, मंगेश चव्हाण, डॉ. मंगेश सावंत, योगेश कांबळे, ओमकार देसाई यांसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी देशात असलेली मुंबईच्या माहुलसह, मथुरा, मेंगलोर आदी ठिकाणच्या रिफायनरीचे कसे दुष्परिणाम झाले आहेत, याची माहिती दिली. यमुना नदीजवळील तसे जगप्रसिद्ध ताजमहलानजीक असलेल्या रिफायनरीमुळे कसे वाईट परिणाम झाले आहेत, त्याची माहितीही देण्यात आली.

तेल गळतीमुळे समुद्रकिनारे होतील प्रदुषित

या रिफायनरी प्रकल्पातून 6 कोटी मेट्रीक टनाची रिफायनरी होणार असून प्रती वर्षाला 1 कोटी मेट्रीक टन कार्बन डाय ऑक्साईड, 5500 मेट्रीक टन सल्फर डाय ऑक्साइड व 72270 मेट्रीक टन नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन होणार आहे. त्याचा वायु, पाणी व जमीन यावर विपरित परिणाम होणार आहे. यामध्ये मानवी जीवन, बागायती, मासेमारी धोक्यात येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. या प्रकल्पातील तेलाची पाईपलाईन समुद्रातून जाणार असल्याने त्यातील होणाऱया तेल गळतीमुळे समुद्रकिनारे प्रदुषित होतील, अशीही माहिती देण्यात आली. मात्र आमचे मुख्यमंत्री या प्रकल्पातून शुन्य प्रदूषण होणार असल्याचे खोटे सांगत असल्याचा आरोप करण्यात आला. मुळात नाणार परिसरातील जी जमीन अधिग्रहित केली आहे, ती एम.आय.डी.सी.च्या नावाने त्यासाठी बजावण्यात आलेल्या 32/2 नोटीसमध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी असा उल्लेखच नाही, असा दावा करण्यात आला.

अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातही दाखवला ‘स्लाईड शो’

या प्रकल्पाबाबत शासन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचाही आरोप केला गेला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा राजाप्रूर तालुका या दोन प्रकल्पामुळे बळी ठरल्याचे सांगताना येथील जनतेने प्रखरपणे रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून आपल्या कोकणचे रक्षण करावे, असे आवाहन उपस्थितांनी शेवटी केले. यावेळी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातही स्लाईड शो दाखवण्यात आला.

Related posts: