|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » निर्मल सागर तट अभियानांतर्गत किनाऱयांचा कायापालट!

निर्मल सागर तट अभियानांतर्गत किनाऱयांचा कायापालट! 

उत्कृष्ट कामगिरी करणाऱया ग्रामपंचायतींना पारितोषिके

रत्नागिरीतील 26 ग्रामपंचायतीचा अभियानात सहभाग

किनारे होणार स्वच्छ, सुंदर, सुविधायुक्त

जान्हवी पाटील /रत्नागिरी

ज्या पध्दतीने शासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ हाती घेतले त्याच पध्दतीने आता निर्मल सागर तट अभियान सुरू करण्यात आले असून यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील 26 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत स्पर्धेचा कालावधी असून येथील मेरिटाईम बोर्ड नियोजन, ग्रामपंचायतींना निधी पुरवणे, प्रोत्साहन देण्याची महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

रत्नागिरीतील सागर किनारे विविध समस्यांनी ग्रासले होते. मात्र हे किनारे आता ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छ करण्यात येत आहेत. यासाठी सुरूवातीला मेरिटाईम बोर्ड रत्नागिरीचे अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले व त्यांच्या टीमने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. स्वच्छता अभियानात मेरिटाईमच्या सर्व कर्मचारी वर्गांनेही सहभाग घेतला. परिणामी येथील भाटय़े बीच असो वा आरेवारे या ठिकाणी स्वच्छता राखली जात आहे. स्वच्छतेबरोबरच बेंचेस, स्वच्छतागृह व इतर सुविधाही उपलब्ध होवू लागल्या आहेत. डिसेंबर 2017 पर्यंत आणखी काही किनारी सुविधांमध्ये भर पडणार आहे. पर्यटकांना या स्वच्छ व सुंदर किनाऱयांची निश्चितच भूरळ पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निर्मल सागर तट अभियानांतर्गत ज्या ग्रामपंचायतींनी 50 टक्के निधी खर्च केला असेल, अशा ग्रामपंचायतींना मेरिटाईम बोर्डाकडून विशेष सहकार्य केले जाणार आहे.

नंबरात येण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रयत्न

निर्मल सागर तट अभियान महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरू करण्यात आले असून यामुळे सागरी किनाऱयांचा चांगला विकास होणार आहे. हे अभियान यशस्वी व्हावे, यासाठी मेरिटाईम बोर्ड विशेष प्रयत्न करीत आहे. या अभियांनांतर्गत स्पर्धेत आपल्या ग्रामपंचायतीचा नंबर यावा, यासाठी ग्रामपंचायती आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. यातून भरीव कामगिरी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यस्तरीय समिती करणार पाहणी

निर्मल सागर तट अभियानाचा एक वर्षाचा कालावधी 2017 डिसेंबरमध्ये संपत असून नवीन कालावधी 1 जानेवारी 2018 पासून सुरू होईल. लवकरच राज्यस्तरीय समिती प्रत्यक्ष ग्रामपंचायत, सागरी किनारा पाहणी करणार आहे. त्यानंतर मे 2018 मध्ये या अभियानातील यशस्वी ग्रामपंचायतींच्या कौतुकासाठी पारितोषिक सोहळय़ाचे आयोजन केले जाणार आहे.