|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इस्लामपुरात आगीत कापड दुकान खाक

इस्लामपुरात आगीत कापड दुकान खाक 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

कोल्हापूर नाका ते वाघवाडी फाटा रस्त्यावरील शास्त्रीनगरमधील दर्शन पॅशन कलेक्शन या कापड दुकानाला आग लागून सुमारे 25 लाख रुपयांची हानी झाली.  फर्निचर व कापडांमुळे संपूर्ण दुकान काही वेळातच खाक झाले. परिसरातील लोकांनी व इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणल्याने ही आग या दुकाना पुरतीच राहीली. भरवस्तीत, शनिवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अग्नितांडवाने प†िरसरात भीतीचे वातावरण होते. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

अनिरुध्द आनंदा वळीव या तरुणाने अलिकडील काही वर्षात हे कापड दुकान सुरु केले होते. या व्यवसायाचा जम बसत असतानाच शनिवारी दुपारी कापड दुकानाला आग लागली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनिरुध्द  हे कापड दुकानाच्यावर पहिल्या मजल्यावर असणाऱया निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना खालून दुकानाच्या खिडकीतून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले. त्यांनी खाली येऊन पाहिले असता, दुकानामधील काऊंटरजवळ आगीचा भडका दिसून आला. दरम्यान, धूर व आग पाहून परिसरातील व्यावसायीक व राहणाऱया लोकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

लाकडी फर्निचर व कपडे यामुळे आगीने अधिकच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे इस्लामपुर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र बंब पोहचेपर्यंत अर्धे अधिक दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. परिसरातील लोकांनी व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱयांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तासातच संपूर्ण कपडे व फर्निचर जळून खाक झाले. या दुकानात शुटिंग, शर्टिंग, साडय़ा व अन्य रेडिमेड कपडे होती. दसरा दिवाळीचा हंगाम आल्याने वळीव यांनी नविन कपडे मागवली होती. कापडांसह फर्निचरचे सुमारे 25 लाखांहून अधिक नुकसान झाले.

या आगीत दुकानातील कपाटांच्या काचा धगीने फुटल्या. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळा येत होता. यावेळी काच लागल्याने एक तरुण किरकोळ जखमी झाला. या दुकानाच्या बाजूस काही अन्य दुकाने व निवासी क्षेत्र आहे. त्यामुळे घबराट पसरली. दरम्यान विज वितरण कंपनीला कळवून या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. या आगी दरम्यान रस्त्यावर लोकांची व वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. इस्लामपूर पोलीस व वीजवितरण कंपनीचे कर्मचारी यावेळी थांबून होते.

बंबांची कमतरता

इस्लामपूर नगरपालिकेने अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारले आहे. मात्र येथे अत्याधुनिक बंबांची कमतरता आहे. केंद्राकडे एक जुना बंब आहे. एक नविन आणि जुना बंब आग आटोक्यात आणण्यासाठी धावत होते. मात्र जुन्या बंबास गळती असल्याने पाणी अपुरे पडत होते. पालिकेने शहराचा विस्तार, वाढणाऱया मालमत्ता लक्षात घेऊन आग्निशमन केंद्र अजूनही सुसज्ज ठेवणे गरजेचे असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकात होती.

Related posts: