|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » घंटागाडी चालक संपावर जाण्याच्या तयारीत

घंटागाडी चालक संपावर जाण्याच्या तयारीत 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील 40 वॉर्डातील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने खाजगी घंटागाडय़ा नेमल्या आहेत. मात्र, या घंटागाडीचा करार संपला आहे. त्यामुळे याच घंटागाडी चालकांनी टेंडर प्रक्रियेत निविदा भरल्या होत्या. त्या न फोडता नव्याने ई-टेंडरींग राबवण्याचा घाट काही भांडवलदारांच्या फायद्यासाठी घातला जात आहे. त्याच्या निषेधार्थ घंटागाडी चालकांनी शनिवारीच संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तशी परिस्थितीही उद्भवली होती. दरम्यान, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सातारा जिल्हा संघटक गणेश भिसे यांनी तातडीने बैठक घेवून सोमवारी प्रशासनाबरोबर बोलून आंदोलनाचा निर्णय घेवू असे सांगितल्याने तात्पुरता संप स्थगित झाला आहे.

सातारा शहर स्वच्छ ठेवण्याचे काम हे पालिकेचे घंटागाडीवाले करत आहेत. घरोघरी जावून कचरा गोळा करुन ते पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत टाकतात. प्रत्येक वॉर्डसाठी 1 घंटागाडी आहे. असे असताना या घंटागाडी मालकांचे करार संपले आहेत. नव्याने करार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पालिका प्रशासनाने बयाणा रक्कम घेतली होती. त्यामुळे पुन्हा आपली गाडी लागावी या हेतूने एका गाडी चालकाने तीन-तीन ठिकाणाहून टेंडर भरले गेले. एका ठिकाणी 2 हजार असे सहा हजार रुपये गुंतवले गेले. परंतु, त्याची कार्यवाहीच झाली नाही. मात्र, नव्याने काही पदाधिकाऱयांनी आणि अधिकाऱयांनी पुन्हा ई-टेंडरींगचे मनसुबे करत भांडवालदारांच्या फायद्यासाठी ही प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे जुने व सध्या कार्यरत असलेले घंटागाडीचे मालक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हेच गृहीत धरुन संपाचे हत्यार उपसल्याचे घंटागाडी चालकांकडून सांगण्यात आले. शनिवारी सकाळी पहिली खेप केल्यानंतर सर्वच घंटागाडी चालकांनी व मालकांनी संप म्हणजे संप असे कारण करत सोनगाव कचरा डेपोमध्ये बसकन मारली. शनिवारपासूनच संप करण्याचा निर्धारही त्यांनी घेतला. याची माहिती अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हा संघटक गणेश भिसे यांनी समजताच ते सोनगाव कचरा डेपोवर पोहचले, त्यांनी घंटागाडी चालक व मालकांची तातडीने बैठक घेतली. त्या बैठकीत स्वतः गणेश भिसे यांनी शनिवारी व रविवार असल्याने दोन दिवस आपण प्रशासनाशी काहीही चर्चा करु शकत नाही. मात्र, सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्याने सातारकर शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यासाठी तुर्तास आपण काम करु या, परंतु पालिका प्रशासनाला आपण सोमवारी भेटू यात, प्रशासनाने जर भांडवलदाराला पोटाशी आणि कष्टकरी कामगाराला पायाखाली घेतले तर हे अजिबात सहन करणार नाही. पालिका प्रशासनाच्या अडेल भूमिकेविरोधात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ तीव्रपणे रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला गेला. त्यामुळे तुर्तास संप मागे घेतला गेला आहे.

Related posts: