|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ मेढा

म्हसवे (ता. जावली) येथील विक्रांत वसंत शिर्के (वय 32) याने व्याजाने घेतलेल्या पैशाची मुद्दल देवूनसुध्दा फलटण येथील सावकारी करणाऱया युवकांनी विक्रांत शिर्के याचे अपहरण करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांना मेढा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून विक्रांत शिर्के याला आरोपी नीलेश बाळासाहेब मोहिते याने आठ लाख रूपये 7 टक्के व्याजाने दिले होते. सदर रकमेचे माहे डिसेंबर 2014 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत 3 लाख 50 हजार रुपये व्याज घेतले असतानाही आरोपी बाळासाहेब दादू मोहिते, सौ. जयश्री बाळासाहेब मोहिते, रमेश तानाजी जाधव (सर्व रा. मुळीकवाडी ता. फलटण) व आरोपी नीलेश याचा मित्र 23 ऑगष्ट 2017 रोजी विक्रांत यास आरोपी नीलेश मोहिते याचे बोलेरो जीपमधून जबरदस्तीने जीवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेले. गाडीमध्ये त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला व विक्रांत यास आरोपीचे घरी नेऊन डांबून ठेवून आरोपींनी मारहाण केली. मुद्दल व व्याज असे 33 लाख रुपये दे नाहीतर तुझ्या मालकीची 3 एकर जमीन नीलेश मोहिते याच्या नावावर करुन दे अशी दमदाटी देत नीलेश मोहिते याने विक्रांतच्या मानेवर तलवार ठेवून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

वरील गुन्हा दाखल होताच मेढय़ाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी आपले सहकारी संजय शिर्के, नितीन पवार, सौ. मीना राऊत, मानसिंग शिंदे, संजय काळे, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दाभाडे, संजय जाधव, रवि वाघमारे, मारूती लाटणे, यांच्या सहाय्याने आरोपींच्या मुळीकवाडी गावी जावून ताब्यात घेवून त्यांनी अटक केली. आरोपींच्या राहत्या घरी एक तलवार, एक बंदुक, व्याजाने पैसे दिलेचे कागदपत्रे, गुन्हा करताना आरोपींनी वापरलेली जीप असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास सपोनि जीवन माने, सहाय्यक फौजदार मानसिंग शिंदे, संजय शिर्के हे करीत आहेत.

Related posts: