|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंबाबाईच्या दर्शनसाठी तिसऱया दिवशीही उच्चांकी गर्दी

अंबाबाईच्या दर्शनसाठी तिसऱया दिवशीही उच्चांकी गर्दी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नवरात्रोत्सवाच्या तिसऱया माळेला सुट्टीचा चौथा शनिवार आल्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्री साडे नऊ वाजता सोन्याच्या पालखीतून साजरा करण्यात आलेल्या अंबाबाईच्या पालखी सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल 1 लाख 52 हजार 146 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे.

   दरम्यान, सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईला मंदिरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ भाविकांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तसेच सकाळी 11 वाजता भेटीसाठी बाहेर पडलेल्या तुळजा भवानी मंदिरातील तुळजा भवानीच्या पालखीने खोलखंडोबा आणि ब्रह्मपुरी येथील गजेंद्रलक्ष्मीदेवीला भेट दिली. पालखी भेटीच्या समारोपानंतर तुळजा भवानीची अश्वारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. तसेच दुपारी दोन वाजता अंबाबाईची अष्टादशभुजा महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. महादेव मुनीश्वर, मकरंद मुनीश्वर आणि रवी माईनकर यांनी ही पूजा बांधली.

   भाविकांनी केवळ अर्धा तासात अंबाबाईचे गाभाऱयाच्या उंबरठय़ापर्यंत जाऊन दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था देवस्थान समितीने केली आहे. तसेच समितीने केलेल्या नियोजनानुसार मंदिरातील कासव चौक आणि गरुड मंडपातूनही हजारो भाविक अंबाबाईचे मुखदर्शन घेत आहेत. अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजापासून शेतकरी संघ कार्यालयापर्यंत उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत महिला व पुरुष भाविकांना देवस्थान समितीचे कर्मचारी अनिरुद्धबापू ट्रस्टच्या कार्यकर्त्यांकडून पाणी वाटप केले जात आहे. तसेच व्हाईट आर्मी आणि जीवनज्योत संस्थेच्या जवानांकडून आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर शनिवार दिवसभरात तब्बल 138 भाविकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.

   अंबाबाईच्या दर्शनासाठी दिवसभरात दीड लाख भाविक मंदिरात आले असले तरीही दुपारी 2 पासून ते 5 या वेळेत महिला व पुरुषांचे दर्शन मंडप ओस पडले होते. सायंकाळच्या आरतीपर्यंत मात्र मंदिरात भाविकांची गर्दी होण्यास सुरवात झाली. रात्री साडे नऊ वाजता साजरा करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यावेळी मात्र मंदिर परिसर स्थानिकांसह परगावाच्या भाविकांमुळे खचाखच भरला होता. पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याच्या पालखीचे ज्येष्ठ भाविकांच्या हस्ते  पूजन करण्यात आले. पुजनासाठी विविध शासकीय अधिकारी अथवा मोठे नेते न बोलविण्याचा देवस्थान समितीने निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

————

उद्या कोहळा पूजन…

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला (रविवारी) सायंकाळी ललिता पंचमीला सुरवात होत असली तरीही सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टेंबलाई मंदिराजवळ कोहळा पूजन्ंंााचा विधी होणार आहे. कुमारिका मृदुला संतोष गुरव हिच्या प्रमुख उपस्थितीत कोहळा पूजन होईल. अंबाबाई, छत्रपती शिवाजी महाराज व तुळजा भवानी आणि गुरू महाराज आदींच्या पालख्या टेंबलाई मंदिरात कोहळा पूजनासाठी दाखल होणार आहेत. दरम्यान, कोहळा पूजनासह टेंबलाईच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी पॅश करण्यासाठी अनेक पाळणे मालकांनी टेंबलाई मंदिर परिसरात  उंच-उंच पाळण्यांची मांडणी केली आहे.

——

दोघा संशयितांना ताब्यात

दर्शनाच्या बहाण्याने अंबाबाई मंदिरात प्रवेश करून भाविकांकडील वस्तूंची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा संशयितांना देवस्थान समितीच्यावतीने पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. हे दोघे मंदिरातच बराच वेळ घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रक राहुल जगताप यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले. त्यांनी तातडीने मंदिरात सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलीस आणि देवसथानच्या सुरक्षा रक्षकांना या दोघांची माहिती कळवली. पोलीस व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले व जुना राजवाडा पोलीसांच्या स्वाधिन केले.

 

Related posts: