|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » न्यायालच्या आदेशामुळे जयवंत नाईक अपात्र प्रश्न स्थगित

न्यायालच्या आदेशामुळे जयवंत नाईक अपात्र प्रश्न स्थगित 

बार्देश बाझारची सर्वसाधारण सभा विविध प्रश्न, सूचनांनी गाजली

प्रतिनिधी/ पणजी

द बार्देश बाझार कंझ्युमर को. ऑप. सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हापसा येथील अर्बन बँकेच्या सभागृहात झाली. बँकेचे संचालक जयवंत नाईक यांनी संचालक मंडळाने बजाविलेल्या कारणे दाखवा नोटीसीविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने जयवंत नाईक यांना अपात्र घोषित करु नये असा आदेश दिल्याने आजच्या बैठकीत हा प्रश्न आला असता, यावर काही बोलल्यास न्यायालयाचा अवमान होईल हे कारण पुढे करुन प्रश्न स्थगित ठेवण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने आपल्यास यावर सर्वसाधारण सभेत बोलण्यास मुभा दिली होती मात्र संचालक मंडळाने आपल्यास बोलण्यास दिले नाही, असा आरोप जयवंत नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बार्देश बाझारच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष गुरुदास सावळ, उपाध्यक्ष रवींद्र फोगेरी, मुख्य प्रमोदर ऍड. रमाकांत खलप, सरचिटणीस ईवेत डिसोझा, ऑडिटर व्यंकटेश शॅणोई उपस्थित होते. सोसायटीला यंदा निव्वळ 75 लाख 23598 रु.चा नफा झाल्याचे यावेळी अध्यक्ष सावळ यांनी सांगितले. सलग आठ वर्षे डिव्हीडंट 20 टक्के देणारी बार्देश बाझारही राज्यातील एकमेव सोसायटी असल्याची माहिती त्यांनी दिली. या सोसायटीने राज्यात ग्राहकांच्या सेवेसाठी जे कार्य केले आहे त्याची माहितीही त्यांनी दिली.

अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी स्वागत केले. सरचिटणीस ईवेत डिसोझा यांनी मागील बैठकीचा अहवाल वाचून दाखविला. भागधारक महेश फळारी यांनी नवीन योजनांबाबत प्रश्न उपस्थित केला तसेच बिल्डींग नुतनीकरण करण्यात आले त्याचे प्रोव्हिजन बजेटमध्ये दिसले नाही, असेही त्यांनी सूचित केले. अध्यक्ष सावळ यांनी यंदाच्या वर्षांचा खर्च पुढील बैठकीत दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले. मांद्रे कॉलेजला दिलेल्या देणगीबाबत रत्नपाल साळकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

प्रा. शशिकांत कांदोळकर यांनी, जयवंत नाईक यांनी संचालक मंडळावर न्यायालयात तक्रार दाखल केली त्याचा खर्च बार्देश बाझार की संचालकांनी स्वतःच्या खिशातून खर्च केला असा प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष सावळ यांनी यासाठी सुमारे तीन लाख खर्च आले तो खर्च बार्देश बाझाराने उचलल्याचे सांगितले. हा प्रश्न खास सभेसमोर ठेवायला पाहिजे होता असे भागधारकांनी सूचित केले. सोसायटीला म्हणजे भागधारकांना नुकसान झाल्याचे महेश फळारी, अनिल नाईक म्हणाले. सलग 27 वर्षे एकनिष्ठ, कोणताही डाग न लावता असलेले प्रमोटर तीन महिन्यात संचालकांसाठी वाईट होतात हे विचार करण्यासारखे आहे, असे प्रा. कांदोळकर म्हणाले. आपापसातील गोष्टी न्यायलयापर्यंत न नेता आपापसात सोडवायला पाहिजे होत्या. यात बार्देश बाझाराची बदनामी झाल्याचे सांगण्यात आले. मंगेश मंत्रवादी यांनीही यास दुजोरा दिला.

सध्या या सोसायटीची वेळ 9 ते 9 अशी केली आहे. येथे 90 टक्के महिलावर्ग आहे. त्यांच्या वेतनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवानी नाईक यांनी मांद्रे कॉलेजबाबत काय कारवाई झाली असे विचारले. महिलांसाठी सेक्युरिटी ठेवावी व लैंगिक शोषण समिती नेमावी अशी मागणी खलप यांनी केली. भागभांडवलमध्ये वाढ करावी असे सुशांत मांद्रेकर म्हणाले. कायम ठेवीवरील व्याजचे पैसे बिल्डींगसाठी वापरावे अशी मागणी त्यांनी केली. क्रीडासाठी थोडा फंड राखीव ठेवावा अशी मागणी गोकुळदास नागवेकर यांनी केली. नवीन ऑडिटरसाठी नंदन मोतीलाल सिरसाट, दिवाकर जोशी, पंढरीनाथ ठाकुर यांची नावे आली असून नंदन सिरसाटच्या नावावर शिक्कामोर्तब करावे अशी सूचना झाली. प्रत्येक बैठकीला कोणकोण संचालक उपस्थित असतात त्याची माहिती सर्वसाधारण सभेत लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी मंगेश मंत्रवादी यांनी केली. उपाध्यक्ष रवींद्र फोगेरी यांनी आभार मानले.

रेकॉडिंगवरुन सभेत गोंधळ

या सभेत एक भागधारक मोबाईलवरुन रेकॉडिंग करीत होता. त्यावेळी अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी आक्षेप घेतला असता बराच गोंधळ निर्माण झाला. यावेळी प्रा. शशिकांत कांदोळकर, एकनाथ म्हापसेकर, सुधीर कांदोळकर, गोकुळदास नागवेकर यांनी रेकॉडिंग केले तर काय झाले असे विचारले. अखेर ऍड. पी. जी. नारुलकर यांनी रेकॉडिंग नको असे सांगितल्यावर सर्व भागधारक शांत झाले. संचालक जयवंत नाईक यांनी आक्षेप घेत रेकॉडिंग सुरु असल्यास काय होते ते सुरुच असू द्यावे, असे म्हटल्यावर थोडा गोंधळ माजला मात्र नंतर सर्व शांत झाले.