|Saturday, September 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चप्पल कारखान्यास अज्ञातांकडून आगचप्पल कारखान्यास अज्ञातांकडून आग 

प्रतिनिधी/ निपाणी

येथील चप्पल कारखान्यास अज्ञातांनी आग लावल्याची घटना शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास ताशिलदार प्लॉटमध्ये उघडकीस आली. संजय विष्णू चव्हाण असे नुकसानग्रस्त कारखाना मालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय हे गेल्या अनेक वर्षापासून चप्पल निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या दोन वर्षापासून ताशिलदार प्लॉटमध्ये त्यांनी छोटा कारखाना उभारून येथे चप्पल निर्मिती सुरु केली होती. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कारखाना बंद करून झोपी गेले होते. यादरम्यान मध्यरात्री अज्ञातांनी कारखान्याच्या खिडकीला लावलेल्या कापडास आगीचा बोळा लावला. यात कापडास मोठे छिद्र पडले.

यानंतर या छिद्रातून हा आगीचा बोळा कारखान्यात टाकण्यात आला. दरम्यान पहाटे 3.30 च्या सुमारास शेजाऱयांना कारखान्यातून धूर येत असल्याचे तसेच उग्र वास येत असल्याचे जाणवले. याची कल्पना त्यांनी तत्काळ संजय यांना दिली. त्यानंतर संजय यांनी शेजाऱयांच्या साहाय्याने पाण्याद्वारे आग विझवली. मात्र तोपर्यंत चप्पलसाठी आवश्यक असणाऱया चामडय़ांच्या 25 पोत्यांपैकी 12 पोती चामडे जळून खाक झाले. या घटनेत सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी सकाळी शहर पोलीस स्थानकाचे एएसआय एम. जी. निलाखे यांच्यासह सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची शहर पोलिसात नोंद झाली असून आग कोणी लावली? याच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

Related posts: