|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बुरखा फाडला पण…

बुरखा फाडला पण… 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दहशतवादी राष्ट्र पाकिस्तानचा बुरखा फाडला. आम्ही गरिबीशी लढतोय आणि पाकिस्तान आमच्याशी लढतोय. आम्ही डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ दिले तर पाकिस्तानने जिहादी दिले. लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, हक्कानी नेटवर्क ही पाकिस्तानचीच निर्मिती असल्याचे सुषमाजींचे सडेतोड बोल पाकिस्तानी पंतप्रधान शाहीदखान अब्बासी यांनी भारतावर पेलेल्या दहशतवादाच्या प्रोत्साहनाच्या आरोपाचा बुरखा फाडण्यास यशस्वी ठरले. कोणत्याही भारतीयाचा सुषमाजींच्या या भाषणाने ऊर भरून येईल. छाती अभिमानाने फुगेल यात शंकाच नाही. पण, पाकिस्तानला आपल्यावर आरोप करण्याची संधी कोणी दिली? गेली दोन वर्षे आपण कोणती सारवासारव करत आहोत याचाही विचार गांभीर्याने करण्याची वेळ देशावर आलेली आहे. सुषमा स्वराज यांनी सलग दुसऱयांदा युनोच्या आमसभेत भाषण केले आहे. नवरात्रीच्या पावन प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणाकडे पाहताना आणि युनोच्या त्या अवाढव्य व्यासपीठावर एक भारतीय महिला कडाडत असताना ऐकायला कोणत्या भारतीयाला आवडणार नाही? सात दशकांच्या भारतीय वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला आणि आपल्या बरोबरच जन्माला आलेल्या पाकिस्तानच्या आजच्या स्थितीचीही जगाला जाणीव करून दिली. वास्तविक जगाने अशी तुलना अनेकदा केलेली आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीत नाही म्हटले तरी प्रत्येकाची एक धारणा बनलेली आहे. मात्र तरीही भारतासाठी ज्यांची दृष्टी महत्त्वाची आहे ते अमेरिका, चीन, रशिया आदी देश भारत-पाकिस्तानच्या मतभेदांकडे आपापल्या फायद्याच्या दृष्टीनेच पाहतात. त्यामुळेच प्रदीर्घ काळ दहशतवादाचा विषय भारताच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत आले. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, रशिया, ब्रिटन, इटलीसह युरोपीय देशातील दहशतवादी हल्ले, आयसीसचा उदय आणि जगाला झालेली डोकेदुखी या घटनांनी सातत्याने दहशतवादाविषयी आवाज उठविणाऱया भारताच्या भूमिकेवर जगभरात विचार होऊ लागलेला आहे. भारताच्या दृष्टीने असे सकारात्मक वातावरण काही वर्षे सुरू असतानाच 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून  केलेल्या भाषणात पाकिस्तानच्या बलुचिस्तानचा उल्लेख केला. अस्वस्थ बलुचिस्तानातील फुटीर चळवळींना भारत उत्तेजन देत असल्याचे उघड विधान केले. त्या दिवसापुरते ते विधान मोठी वाहवा मिळवून गेले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तात्काळ त्या विधानाचा उदोउदो केला. मात्र मोठी किंमत भारत आजही चुकवत आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान अब्बासी यांनी भारतावर पाकिस्तानातील दहशतवादामागे भारत असल्याच्या युनोमध्ये केलेल्या आरोपामागे मोदी यांचे स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण आहे. ज्याच्यावर त्यावेळी चीन आणि रशियानेही नापसंती व्यक्त केली आणि ऑक्टोबर 2016 मध्ये गोव्यात झालेल्या ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करण्याच्या आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला दहशतवादी ठरवण्याच्या मोदींच्या मनसुब्यांना चीनने सुरूंग लावला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या दहशतवादाच्या मुद्यालाच बगल दिली. यंदाच्या वर्षी ब्रिक्स परिषदेत मात्र पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी जोडण्यास चीन आणि रशिया यांनी अनुमती दिली. भारताचा हा मोठा विजय मानला जात असला तरी या परिषदेत भारताची मूळ मागणी आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांना शह देण्यासाठी ब्रिक्समधील ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या स्वतंत्र पतमानांकन संस्था निर्मितीची होती. ज्याला बगल देण्यात आली. डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव आणि ब्रिक्स परिषदेच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रांनी दाखविलेले सामंजस्य जगाने पाहिले. मात्र परिषद संपताच आपली डोकलामबाबत भूमिका कायम असल्याची भूमिका चीनने जाहीर केली. आपले शेपूट कधीही सरळ होणार नाही हे दाखवून देणाऱया माओच्या आजच्या वारसदारांनी बेभरवशी आणि दुखापत करून फुंकर घालण्याचे राजकारण कायम ठेवले आहे. त्यामुळेच लष्करी अधिकाऱयांचे वक्तव्य वेगळे येत असतानाच व्यापार क्षेsत्रातील अधिकाऱयांनी मात्र भारत-चीनचे डोकलामबाबत सामंजस्य असल्याचे आजच जाहीर केले आहे. चीनची असलेली बलुचिस्तानातील गुंतवणूक आणि भारताला शह देण्यासाठी पाकिस्तानचा केला जाणारा वापर, अमेरिकेच्या तेलसंपन्न राष्ट्रांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी पाकिस्तानची गरज या कारणांनी त्यांची भारताला संपूर्ण समर्थनाऐवजी बोळवण करण्याचीच नीती असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. त्यातच आपला जुना मित्र असलेल्या रशियाला अमेरिकेशी भारताचे वाढते मैत्र फारसे पचनी पडत नसल्याने दहशतवादाच्या मुद्यावर ‘केव्हाही आणि कुठेही’ साथ देण्याची तयारी असूनही ती साथ लाभत नाही. ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध जोडल्याने पाकिस्तान भारतावर युनोत आरोप करणार हे निश्चितच होते. पण, त्या आरोपांना मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणाचे बळ मिळाले आहे. चीनला नेहमीच अशी संधी शोधण्याची सवय असते. त्यामुळेच दहशतवादाच्या मुद्यावर पायाखालची वाळू सरकलेल्या पाकिस्तानलाच पुन्हा प्यादे बनवून भारताची प्रतिमा जगात मलीन करण्याचा प्रयत्न झाला हे लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर सुषमाजींनी केलेले तडाखेबंद भाषण हे एकाचवेळी अभिमान वाटावा असे असले तरी ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने खुलासा करणारे भाषण आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. दहशतवादाचा सर्वात मोठा फटका भारताने सोसलेला आहे. त्याला पाकिस्तानच कारणीभूत आहे आणि त्यासाठी पाकिस्तानने वापरलेला पैसा हाही चीन, अमेरिकेच्या मदतीतून उभारलेला आहे. आम्ही दहशतवादाच्या विरोधात लढतो आहोत असे नाटक करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळवलेला पैसा जगाला त्रासदायक ठरणाऱया दहशतवाद्यांचा संहार करण्यासाठी वापरण्याऐवजी पाकिस्तानने तो पोसण्यासाठी वापरला आहे. भारत गेल्या काही वर्षात हे सिद्ध करण्यात यशस्वी झाला असला तरी भारतालाच आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करू पाहतो आहे. अशावेळी भारताने त्याला सडेतोड उत्तर देतानाच दहशतवादाची व्याख्या केली पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण जगाने समदृष्टीने पाहिले पाहिजे. माझा तुझा असा भेद करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण, दुर्बलाच्या अपेक्षेला किंमत नसते. भारत सबळ होत आहे याचे पुरावे भारताला द्यावे लागतील. केवळ गरीबी हटावच्या घोषणांनी ते साधणार नाही. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आजही भारताला कमी लेखतात हे मोदींचे दुःख आणि संताप असला तरी घसरलेला विकास दर भारताची बाजू लंगडी बनवत आहे. दैन्य आणि दहशतवादाशी झगडणारा भारत ही सुषमा स्वराज यांच्या भाषणातून भारताची प्रतिमा झाली असली तरी सक्षम देशाचे स्वप्न पाहणाऱया भारताला एक छोटीशी चूकही किती महागात पडते हे आता जाणवते आहे. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाचे ठाम मत बनवायचे असेल तर भारताला तितके सक्षम व्हावे लागेल आणि त्याला आर्थिक सक्षमता हाच एक पर्याय आहे. आपण जनतेच्या मनातले तेच गेले तीन वर्षे बोलत आहोत असे मोदी यांनी मन की बात मध्ये सांगितले. पण, पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या मुत्सद्दीपणाआड ही मन की बात येऊन चालणार नाही. जगाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असतानाही भारत स्थिर होता हा भारताचा इतिहास आहे तो पुन्हा वर्तमान बनत नाही तोपर्यंत भारताने कितीही प्रभावी भाषा वापरली तरी त्याचा परिणाम केवळ भारतीय मनावरच होईल. जगावर प्रभाव पाडण्यासाठी भारताला अजून खूप काही करावे लागणार आहे.

Related posts: