|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट

पाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट 

संयुक्त राष्ट्रसंघात बनावट छायाचित्र, भारताच्या बदनामीचे कारस्थान, जगात बेअब्रू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताची बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱया पाकिस्तानची याच प्रयत्नात जगभरात बेअब्रू झाली आहे. भारत काश्मीरमध्ये कसे अत्याचार करत आहे, हे पुराव्याने सिद्ध करण्याच्या नादात त्याने संयुक्त राष्ट्रसंघात एक छायाचित्र सादर केले. पण ते काश्मीरमधील नसून पॅलेस्टाईनमधील असल्याचे उघड झाल्याने त्याने स्वतःची लाज घालवून घेतली. एवढे होऊनही निर्लज्जपणा न सोडता त्याने भारतालाच दहशतवादी राष्ट्र ठरविण्यासाठी केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोदी यांनी आमसभेत प्रत्युत्तराचे भाषण करताना भारतावर टीका करण्याचा मोठा आव आणला. पुराव्यादाखल एक छायाचित्रही फडकावले. पण हे छायाचित्र इस्रायलच्या गाझा पट्टीतील एका युवतीचे होते. त्याचा काश्मीरशी काहीही संबंध नव्हता. या युवतीचे नाव रावया अबु जोम असे असून हे छायाचित्र हिदी लेव्हिन या छायाचित्रपत्रकाराने 2014 मध्ये काढले आहे. त्याला पुरस्कारही मिळाला आहे.

स्वतःचेच वस्त्रहरण 

यामुळे पाक अक्षरशः उघडा पडला. स्वतःच्याच हाताने त्याने जगासमोर स्वतःचे वस्त्रहरण केले. पाकच्या या प्रयत्नांमुळे उलट भारताची बाजू भक्कम झाली. भारताचा दुःस्वास त्याला महागात पडला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ज्या आक्रमकपणे पण सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता भारताची बाजू आपल्या भाषणात मांडली, त्या तुलनेत पाक अगदीच फिका पडला. या घटनेनंतर ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर पाकची छी छू करणाऱया संदेशांची आणि खिल्ली उडविणाऱया विनोदांची लाटच उसळली आहे.

तरीही कोडगेपणा कायम

लाज जाऊनही कोडगेपणा करण्याची आपली परंपरा मात्र पाकिस्तानने कायम राखली. ‘भारत दहशतवादाची जननी आहे’ असा कांगावा केला. भारत पाकमधील अनेक दहशतवादी घटनांना जबाबदार आहे. भारत पाकमध्ये हिंसाचार घडवित आहे. त्यासाठी पैसा पेरत आहे, अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी उधळली. तथापि, त्याचा उपस्थित सदस्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. उलट पाकचा पोरकटपणाच पुन्हा सिद्ध झाला.

म्हणे दहशतवादी राष्ट्र ठरविणार

भारताला दहशतवादी राष्ट्र ठरविण्याचा घाट घालून पाकने पुन्हा आपला भारतद्वेष दाखवून दिला आहे. यासाठी काही मित्र राष्ट्रांचे साहाय्य घेण्याचा त्याच विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, त्याला कोण साहाय्य करणार हाच प्रश्न असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

सदस्यत्व गमावण्याची शक्यता

बनावट छायाचित्र दाखवून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाची दिशाभूल केली आहे. परिणामी, त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची पाकने मानहानी केली. शिष्टाचार धाब्यावर बसवले. या प्रतिष्ठित संस्थेला कमी लेखले. ही कृती राष्ट्रसंघाच्या मूळ तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. हे प्रकरण पाकला फार महागात पडू शकते. त्याला राष्ट्रसंघाचे सदस्यत्वही गमवावे लागू शकते, अशी मते आता व्यक्त होत आहेत.

Related posts: