|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात फ्लॅट फोडून पावणेतीन लाखाची चोरी

चिपळुणात फ्लॅट फोडून पावणेतीन लाखाची चोरी 

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरातील गोवळकोट रोड परिसरातील आफ्रिन पार्कमधील फरहा अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरटय़ांनी 2 लाख 71 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यात रोख रक्ढमेसह दागिन्यांचा समावेश असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संकुलातील इतर फ्लॅट फोडण्याचाही प्रयत्न झाला.

  वसीम हबीब मेमन यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. या फ्लॅटमध्ये त्यांचे आई-वडील राहतात. शनिवारी फ्लॅटमध्ये पाणी नसल्याने ते याच परिसरात राहणाऱया आपल्या दुसऱया मुलाकडे गेले होते. तेथून ते रविवारी सकाळी परत आले असता त्यांना आपला फ्लॅट फोडल्याचे दिसले. त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे या उपनिरीक्षक भालचंद्र धालवलकर यांच्यासह घटनास्थळी गेल्या. त्यानंतर याचा पंचनामा करण्यात आला.

   त्यानुसार मेमन यांच्या कपाट व बेडमधून 1 लाख 75 हजार रूपयांची रोकड, सोन्याची चेन, कर्णफुलाचे चार जोड, रिंग, टॉप, लॉकेट असे दागिने मिळून 2 लाख 71 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या चोरीच्या तपासाबाबत डॉ. जानवे यांनी मार्गदर्शन केले असून धालवलकर तपास करीत आहेत. याच संकुलातील अन्य फ्लॅटही फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथून काहीही चोरीला गेलेले नाही. चोरटय़ांनी घरातील बेन्टेक्सच्या दागिन्यांना हात न लावल्याने ते सराईत असण्याची शक्यता गृहित धरून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

   या चोरीनंतर रत्नागिरी येथून ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते, तर सिंधुदुर्ग येथून श्वान पथकालाही बोलावण्यात आले असून ते सोमवारी येण्याची शक्यता आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Related posts: