|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘राईस पुलिंग’प्रकरणी बेंगळूरमधून महिला अटकेत

‘राईस पुलिंग’प्रकरणी बेंगळूरमधून महिला अटकेत 

प्रतिनिधी/ निपाणी

राईस पुलींग हे जादूचे भांडे खरेदी केल्यास अल्पावधीतच धनदौलत मिळेल, सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगून मुंबई-गोरेगाव परिसरातील नागरिकांची 2 कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पाच दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी बेंगळूर येथून आणखी एक संशयित महिलेस अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. भाव्या निर्णय जैन असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

 सदर प्रकरणातील संशयित अस्लम गौस पठाण याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त निपाणीतील आणखी दोघे वासिम सोलापुरे व नियाज पठाण हे अद्याप फरारच आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मुंबईतील प्रसाद कोसबे याने अस्लम व इतरांची सदर नागरिकांशी ओळख करून दिली. यातूनच सदर इच्छुक नागरिकांना करोडो रुपयांच्या मोबदल्यात राईस पुलींग या भांडय़ाचा पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे या भांडय़ाबाबत विश्वास बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीतून याची तपासणी करून घेऊ असे सांगत अस्लम हा भाव्या जैन यांच्या कंपनीत भांडय़ाची तपासणी करून घेत होता.

 मात्र भाव्या जैन व तिचा पती निर्णय जैन याच्या मालकीची ब्लूम एनर्जी ही कंपनी बोगस असल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच अस्लम व जैन यांचे ग्राहकास राईस पुलींग भांडे पुरवण्यापूर्वीच बोलणे होत असल्याचे समजते. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी मुंबईतून प्रसाद कोसबे याला ताब्यात घेतले. यानंतर अस्लमला ताब्यात घेण्यात आले. आता तिसरा संशयित म्हणून भाव्याला अटक करण्यात आली. तर उर्वरित निर्णय जैन तसेच वासिम व नियाज हे फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

  दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भाव्या व निर्णय जैन यांनी ब्लूम एनर्जी या कंपनीच्या नावाखाली बेळगाव येथेच हा व्यवसाय केला. त्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे पती-पत्नी बेंगळूरला गेले होते. सदर प्रकरणात तिघांना अटक झाली आहे. उर्वरित तिघेही लवकरच सापडतील असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात फसवणुकीचा फटका आणखी कोणाला बसल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार आणखी 5 ते 6 जणांनी पोलिसात राईस पुलींगद्वारे झालेल्या फसवणुकीची तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढणार आहे.