|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिंदू समाजाला सामर्थ्यवान बनविण्याचा रा.स्व.संघाचा उद्देश

हिंदू समाजाला सामर्थ्यवान बनविण्याचा रा.स्व.संघाचा उद्देश 

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंदू समाजावर हजारो वर्षांपासून आक्रमणे होत असली तरी हा समाज उभा आहे. या समाजाला सामर्थ्यवान बनविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे. विजयाचा संकल्प घेऊन संघाची वाटचाल सुरू असून हिंदू समाजाला संघटित आणि जागरुक करण्याचे काम संघ अनेक वर्षांपासून करीत आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाहचे क्षेत्र संयोजक रघुनंदन यांनी केले. रा. स्व. संघ, बेळगावच्यावतीने रविवारी विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रघुनंदन यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. दरम्यान, कार्यक्रमाच्या वेळीच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

रविवारी येथील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर संघाचा विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांचे शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन झाले. रघुनंदन यांनी विजयादशमीचे पर्व म्हणजे विजयाचे संकेत असून, जगात हिंदूंची शक्ती वाढत आहे. हिंदू समाजाबद्दल जगात आस्था निर्माण झाली आहे. हिंदू समाजाची शक्ती वाढविण्याचा संकल्प घेऊन संघाचे कार्य आणखी वाढविण्यात येणार आहे, असे सांगून रघुनंदन यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रशेखर बेंबळगी यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. अनेकांनी संघ कार्य तसेच हिंदुत्वासाठी त्याग केल्याने संघ वाढला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातही संघाचे कार्य सुरू असून, कठीण परिस्थितीतही कार्य करण्याची प्रेरणा संघाकडून मिळत असल्याचे बेंबळगी यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी नगर संघचालक बाळण्णा कग्गणगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

विजयादशमी उत्सवानिमित्त दुपारी 4 वाजता लिंगराज कॉलेज मैदानावरून गणवेशधारी स्वयंसेवकांचे सघोष पथसंचलन काढण्यात आले. कंग्राळ गल्ली, काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, बुरुड गल्ली, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, ध. संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, गेंधळी गल्लीमार्गे पुन्हा लिंगराज कॉलेज मैदानावर पथसंचलनाची सांगता करण्यात आली.   

Related posts: