|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य

भारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य 

वार्ताहर/ हुक्केरी

भारत देशात साधूसंत, महापुरुष जन्माला आलेत. भारत हा पुण्यवान देश आहे. या देशात माझा जन्म झाला हेच माझे भाग्य समजतो. मी देशवासीयांच्या सेवेतून ऋण फेडण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन योगमहर्षि रामदेव बाबा यांनी केले.

  हुक्केरी येथील गुरुशांतेश्वर हिरेमठाचा दसरा महोत्सव व श्री चंद्रशेखर स्वामीजींचा पीठारोहण रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगमहर्षि रामदेवबाबा यांना ‘रेणुका श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री चंद्रशेखर शिवाचार्य (हुक्केरी), श्री शिवलिंगेश्वर स्वामीजी (निडसोसी), श्री मुरगेंद्र स्वामीजी (मुगळखोड) यांचे दिव्य सानिध्य लाभले होते.

रामदेवबाबा पुढे म्हणाले, श्रीराम, श्रीकृष्ण, परमेश्वर, शिवाजी महाराज, गौतमबुद्ध, महावीर अशा साधूसंतांच्या जन्माचे ठिकाण असणाऱया भारतभूमीत आपलाही जन्म झाला. या सौभाग्याचे ऋण फेडण्यासाठी आपण सर्वांनी देशाच्या सेवेसाठी आघाडीचे प्रयत्न करायला हवेत. साधूसंत, आईवडील यांच्यातच आपण भगवंत पाहिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

योगा हाच परमेश्वर

 देशाला सुदृढ बनवायचे असेल तर देशातील प्रत्येकाने योगाच्या माध्यमातून आपला देह सुदृढ, निरोगी ठेवायला हवा. देह स्वच्छ, प्रामाणिक असेल तर जातीधर्माच्या मतभेदी राजकारणाला निश्चितच तिलांजली मिळते. कर्म करणाऱयांत कर्तव्याची नेहमीच जाण असते. माझी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचे उत्पादन बनवून स्वदेशवासीयांना विक्री करतो. यातून मी नफ्याची कधीच अपेक्षा केली नाही. त्यासाठी ट्रस्टी स्थापन करून या कंपनीचा कारभार पारदर्शक ठेवला आहे.

कार्यक्रमातही योगाचे धडे दिले

रामदेवबाबा यांनी भाषण करत असतानाच योगाचे प्रकार प्रदर्शित केले. प्रत्येक प्रकाराचे स्पष्टीकरण देत योगाची आरोग्यास होणारी मदत कशी, याचे यावेळी विश्लेषण केल्याने उपस्थित नागरिकांना कार्यक्रमातच योगा करण्याचे भाग्य लाभले होते.

 प्रारंभी ‘श्री नुडी’ हे मठासह स्वामीजींच्या कार्याबद्दलची माहिती असणारे पुस्तक रामदेवबाबा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यानंतर स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख 50,000 रुपये व शाल-श्रीफळ देऊन रामदेवबाबा यांना श्री रेणुकाश्री पुरस्कार श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, श्री शिवलिंगेश्वर स्वामी, श्री मुरगेंद्र स्वामी, खासदार प्रभाकर कोरे, बिदरचे खासदार भगवंत खुबा व रमेश कत्ती यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार पी. राजू, माजी मंत्री शशिकांत नाईक, नगराध्यक्ष जयगोंडा पाटील, उपाध्यक्ष गुरुराज कुलकर्णी या मान्यवरांसह 108 स्वामीजी उपस्थित होते.

श्री चंद्रशेखर स्वामीजींचा सत्कार

 पीठाभिषेक सोहळय़ाला 25 वर्षे पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा रामदेवबाबा यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, रामदेवबाबा यांचे योगा देशाला उत्तेजित करीत बलशाली बनवित आहे. ते आपल्या दृष्टीने वरदान असून योगा देशातील प्रत्येक कुटुंबात पोहचवण्याचे प्रभावी कार्य त्यांनी केले आहे. त्यांचा गौरव हाच योगाचा गौरव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 सुरुवातीला माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्वागत भाषण केले. तर शिक्षक सी. एम. दरबारे, रामचंद्र काकडे, शैला कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला 20 हजाराच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता