|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » बाजाराची सलग पाचव्या सत्रात घसरण

बाजाराची सलग पाचव्या सत्रात घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 296, एनएसईचा निफ्टी 92 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

गेल्या आठवडय़ात सुरू झालेली बाजारातील घसरण कायम असून सेन्सेक्स आणि निफ्टी 0.90 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरत बंद झाले. सलग पाचव्या दिवशी बाजार कमजोर होत बंद झाला. निफ्टी 9,900 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली उतरला. बाजारात सर्व निर्देशांकात घसरण दिसून आली. उत्तर कोरिया आणि इराणमुळे तणाव वाढत असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसत आहे. याव्यतिरिक्त रुपया कमजोर झाल्याने अर्थव्यवस्थेविषयीच्या चिंतेत वाढ झाली.

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागात सर्वाधिक विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरत 15,440 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.3 टक्क्यांनी कमजोर होत 18,150 वर स्थिरावला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरत 16,000 च्या खाली घसरत बंद झाला.

बँकिंग, वाहन, एफएमसीजी, आयटी, धातू, औषध, रिअल्टी, भांडवली वस्तू आणि तेल आणि वायू समभागात जोरदार विक्री झाली. बँक निफ्टी साधारण 1 टक्क्याने घसरत 24,165 वर बंद झाला.

निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.9 टक्के, वाहन निर्देशांक 1.1 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1 टक्का, आयटी निर्देशांक 0.6 टक्के, धातू निर्देशांक 1.2 टक्के आणि औषध निर्देशांक 1.8 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 3.5 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 1.6 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी कमजोर झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 296 अंशांने घसरत 31,627 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 92 अंशाने घसरत 9,873 वर स्थिरावला.

दिग्गज समभागांची कामगिरी

टाटा पॉवर, कोल इंडिया, झी एन्टरटेनमेन्ट, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनि, रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि टीसीएस 1.8-0.25 टक्क्यांनी वधारले. एसीसी, अरबिंदो फार्मा, अदानी पोर्ट्स, इंडियाबुल्स हाऊसिंग, अंबुजा सिमेंट, टाटा स्टील, आयटीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि ल्युपिन 3.3-2 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात युनायटेड बेव्हरेजीस, ओबेरॉय रिअल्टी, इंडियन हॉटेल्स आणि टोरेन्ट पॉवर 6.25-1.8 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स कॅपिटल, सेन्ट्रल बँक, एल ऍण्ड टी फायनान्स, एमआरपीएल आणि अदानी एन्टरप्रायजेस 5.9-4.2 टक्क्यांनी घसरले.