|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाटीलबुवा विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

पाटीलबुवा विरोधात आणखी एका महिलेची तक्रार 

पोटात पाणी झाले असताना गरोदर असल्याची बतावणी

आवाज उठवल्यावर दमदाटी, धमकी दिल्याची तक्रार

प्रतिनिधी /रत्नागिरी

झरेवाडी येथील भोंदू पाटीलबुवाला अटक झाल्यानंतर त्याच्या अनेक करामती पुढे येऊ लागल्या आहेत. सोमवारी आणखी एका महिलेने या बाबाविरोधात तक्रार दिली असून त्याच्या बतावणीमुळे आपले कुटुंब उध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. पोटात पाणी झाल्याने आजारी असलेली महिला गर्भवती असल्याचे या बाबाने सांगितले होते. एवढेच नव्हे तर नऊ महिने सोनोग्राफी वगैरे करू नकोस, तसे केल्यास धोकादायक ठरेल असा सल्ला दिला होता. मात्र हे सर्व थोतांड असल्याचे उघड झाल्यानंतर तिने आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यावर दिला दमदाटी व धमकावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

भोंदू पाटीलबुवाच्या नाना करामती पुढे येऊ लागल्या असून त्याच्याविरोधात तक्रार देणाऱया महिलांची संख्या आता तीन झाली आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि ग्रामीण पोलीसांनी केलेल्या आवाहनानंतर आता अनेक पिडीत पुढे येऊ लागले आहेत. सोमवारी आणखी एका पीडित महिलेने पाटीलबुवाविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. आपण गरोदर नसताना गरोदर असल्याचे त्याने सांगितले त्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. या प्रकारात आपला जीवही गेला असता मात्र वेळीच डॉक्टरांकडे गेल्याने अनर्थ टळला. डॉक्टरांच्या तपासणीत आजारपणामुळे पोटात पाणी झाल्याचे निदान झाले आणि कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. आपल्या पतीने या सगळय़ा गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता माझ्या पतीला मारण्याचाही प्रयत्न केला गेला. आपल्यालाही दमदाटी करत नाना प्रकारे त्रास दिला, एकवेळ कोंडूनही ठेवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पाटीलबुवाची गुरूवारी पोलीस कोठडी संपत आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे अद्यापही तक्रारदार असतील तर त्यांनी न घाबरता पुढे यावे जेणेकरून पाटीलबुवाला कडक शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आवाहन पुन्हा एकदा अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केले आहे.

साथीदार जयंत रावराणे अद्यापही फरार

महिलेला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेला भोंदू पाटीलबुवाचा साथीदार जयंत रावराणे आद्याप फरारच आहे. त्याच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली. पाटीलबुवाचा भक्त म्हणून मठात यायचा. त्याच्याविरोधात एका महिलेने शिविगाळची तक्रार दिली आहे. मात्र यापेक्षा अधिक त्याच्याविरोधात काहीही आढळलेले नसल्याचेही पोलीसांनी सांगितले. दरम्यान रावराणे हा सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील असून तो राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते.

जयंत रावराणे विरोधात अद्यापही एकाच महिलेने शिवीगाळची तक्रार दाखल केली असून हा एकच गुन्हा त्याच्याविरोधात दाखल आहे. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. रावराणेला चौकशीसाठी हजर करण्यात येणार आहे. अद्यापही रावराणे पोलीसांना सापडला नसून योग्य तपासानंतर त्याचीही चौकशी होईल. अधिक तपशील घेण्याचे काम पोलीस स्थानकामार्फत सुरू आहे. मूळचा सिंधुदूर्ग जिल्हय़ातील असून सुरूवातीला काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. आता त्यांनी पक्ष बदलल्याचेही सांगितले जात आहे.

Related posts: