|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘स्वाईन फ्लू’सदृश तापाने अभियंत्याचा मृत्यू

‘स्वाईन फ्लू’सदृश तापाने अभियंत्याचा मृत्यू 

प्रतिनिधी / मालवण :

मालवण सार्वजनिक बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत असणारे किरण संदिपान शिंदे (38) यांचे स्वाईन फ्लूसदृश तापाने उपचारादरम्यान सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास म्हापसागोवा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मालवण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय होता. मालवणातील उपचारांना दाद मिळत नसल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते.

मूळ सोलापूर येथील रहिवासी असणारे किरण शिंदे हे 14 ऑगस्ट 2008 रोजी मालवण येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून रुजू झाले होते. गेली नऊ वर्षे ते मालवण सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना तापाची लागण झाली होती. त्यांना अधिक उपचारासाठी मालवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डेंग्यूसदृश तापाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असता त्यांना स्वाईन फ्लूसदृश तापाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. स्वाईन फ्लूमुळे त्यांच्या फुफ्फुसावरही परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. उपचार सुरू असतानाच सोमवारी म्हापसागोवा येथील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतदेह सोलापूरला

गोवा येथे निधन झाल्यानंतर किरण शिंदे यांचा मृतदेह मूळ गावी सोलापूर येथे नेण्यात आला. सोबत त्यांची पत्नी आणि मुलालाही मालवणातून नेण्यात आले. यावेळी बांधकाम विभागातील अनेक अधिकारी शिंदे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. शिंदे यांना मालवण बांधकाम विभागामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. शिंदे हे काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे गेले होते. तेथूनच त्यांना तापाची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मालवणात खबरदारीची आवश्यकता

मालवण शहरात गेले अनेक दिवस तापाच्या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात
ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाला डेंग्यूसदृश तापाचीही लागण झाली होती. तसेच अनेक रुग्ण विशेष तापाचे होते. सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होत नसल्याने तापाच्या साथीबाबत निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील हे स्वत: आजारी असतांनाही रुग्णांना सेवा देत आहेत. किरण शिंदे यांचा स्वाईन फ्लू
सदृश तापाने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाने तातडीने मालवण शहरात खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. तसेच पालिकेनेही आपल्या उपाययोजनांमध्ये सुधारणा करून डास प्रतिबंधक फवारणी मोहीम जोमाने राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.