|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फातोर्डा स्टेडियमाचा ताबा उद्यापासून सुरक्षा दलांकडे

फातोर्डा स्टेडियमाचा ताबा उद्यापासून सुरक्षा दलांकडे 

प्रतिनिधी/ मडगाव

7 ऑक्टोबरपासून मडगावात सुरु होणाऱया फिफा यू-17 विश्व क्रीडा स्पर्धेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था आखण्यात आलेली आहे. उद्या 27 सप्टें. पासून फातोर्डा स्टेडियमाचा ताबा सुरक्षिततेच्यादृष्टीने सुरक्षा दळाकडे सोपविण्यात येणार आहे अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक आयपीएस अरविंद गावस यांनी दिली.

गोव्यातील या स्पर्धा कोणत्याही गालबोटाविना पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दळ यासारख्या दळांचे यापूर्वीच मडगावात आगमन झाले असल्याची माहिती श्री. गावस यांनी दिली.

आज आणखी जवान येणार

केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दळाच्या दोन कंपन्यांचे यापूर्वीच मडगावात आगमन झालेले असून आज मंगळवारी आणखी दोन कंपन्या दाखल होणार आहेत. एका कंपनीमध्ये साधारणतः 75 जवान असतात. याचाच अर्थ या दळाच्या 150  कर्मचाऱयांचे यापूर्वीच मडगावात आगमन झालेले असून आणखी 150 जवान आज मंगळवारी मडगावात येणार आहेत, ते म्हणाले.

सीमा सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या यापूर्वीच मडगावात दाखल झाल्या असून आणखी दोन कंपन्या येणार आहेत. या सर्व दळांचे जवान या स्टेडिययमच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने 24 तास पहारा देतील. उतोर्डा, बाणावली, वास्को, बांबोळी येथे क्रीडापटूंचा सराव असणार आणि त्यासाठीही विविध दळांचे जवान तैनात करण्यात येणार आहे. बांबोळी ही जागा उत्तर गोव्यात मोडत असली तरीही बांबोळीसाठी सुरक्षा व्यवस्था मडगावातूनच करण्यात येणार असल्याची माहिती श्री. अरविंद गावस यांनी दिली.