|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमध्ये ‘ब्रेक टेस्टिंग ट्रक’साठी जागा उपलब्ध करा

खेडमध्ये ‘ब्रेक टेस्टिंग ट्रक’साठी जागा उपलब्ध करा 

शिवसेना जिल्हाप्रमुख कदम यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /चिपळूण

उत्तर रत्नागिरीतील वाहनांच्या बेक टेस्टींग टॅकसाठी खेड तालुक्यातील असगणी येथील निवडलेल्या जागेची उपलब्धता 5 ऑक्टोबरपर्यंत करून न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहनांची बेक तपासणी रत्नागिरी-झरेवाडी येथे करण्याच्या दृष्टीने एकच ट्रक अस्तित्वात आहे. पूर्वी जिल्हय़ातील वाहनांचे पासिंग प्रत्येक तालुक्यात आरटीओ कॅम्प ठिकाणी होत असे. मात्र आता जिल्ह्य़ात केवळ एकाच ठिकाणी होत असलेल्या पासिंगमुळे उत्तर रत्नागिरीतील वाहनचालकांना दीडशे ते दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामध्ये आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार असगणीत जिल्हय़ातील दुसऱया ब्रेक टेस्टींग ट्रकबाबत ऑगस्ट 2016 पासून पत्रव्यवहार करत आहे. मात्र आजतागायत जागेची उपलब्धता झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी लक्ष देऊन जागेची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच तालुकास्तरावर पूर्वीप्रमाणेच आरटीओ कॅम्प होणाऱया ठिकाणी जागेची उपलब्धता करावी. असगणी येथील ट्रकसाठी जागेची उपलब्धता आठवडाभरात न झाल्यास उत्तर रत्नागिरी शिवसेना यासाठी रस्त्यावर उतरेल, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

खड्डेमुक्त रस्त्यासाठीही निवेदन

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गासह राज्य जिल्हा मार्गावरील खड्डे भरले जातील, असे वचन शासनाने दिले होते. मात्र हे खड्डे भरले गेले नसून सद्यस्थितीत महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यासाठीही कार्यवाही करावी, असेही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, महेश नाटेकर, चारूता कामतेकर, ऋतुजा खांडेकर, सुनील मोरे, अनंत करबेळे, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके आदी उपस्थित होते.

 

 

Related posts: