|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बुवाबाजीच्या विळख्यात कोकण

बुवाबाजीच्या विळख्यात कोकण 

शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केल्यानंतर बुवाबाजीला आळा बसेल असे वाटले होते. मात्र झालेला कायदा निव्वळ कागदावरच असल्याचे पाटीलबुवाच्या प्रकरणांतून दिसून येत आहे.

 

सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी करणाऱया यंत्रणा, त्यांचे अधिकारीच भोंदू बुवाच्या पायाशी लोळण घेत असतील तर सर्वसामान्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडे धरायची? रत्नागिरीतील झरेवाडीतील पाटीलबुवावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. पोलीस दलातून बाहेर पडून थेट बुवाबाजीकडे वळलेल्या पाटीलबुवाने उभे केलेले साम्राज्य आणि त्यामध्ये असलेला अनेकांचा वावर हा कोकणवासियांना शरमेने मान खाली घालायला लावणारा आहेच. शिवाय शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याचीही थट्टा उडवणारा आहे. कोकणात आजही वाडीवस्तीवर असे अनेक भोंदूबुवांनी आपले बस्तान ठोकलेले आहे. बुवाबाजीच्या मायाजालात गुरफटलेली कोकणी जनता यातून बाहेर कधी पडणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. 

रत्नागिरीत गेल्या आठवडाभरापासून पाटीलबुवाच्या कारनाम्याच्या व्हीडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवल्यानंतर त्याच्या वर्तनाने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरणे स्वाभाविक असले तरी असल्या बुवाबाजीच्या विळख्यात समाज किती भरकटत चालला आहे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या भोंदू पाटीलबुवावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे किस्से बाहेर पडू लागले आहेत. स्वत:ला देव म्हणवणाऱया या पाटीलबुवाची अश्लीलता आणि शिव्या या भक्तांसाठी एकप्रकारे प्रसाद समजला जात असे आणि हा ‘प्रसाद’ मिळवण्यासाठी त्याच्या भक्तगणांमध्ये चढाओढ लागत असल्याची चर्चाही फसवणुकीत बळी पडलेल्या त्याच्या भक्तगणांमधूनच पुढे येऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस दलात वाहनचालक असलेला हा बुवा पोलीस दलातून बाहेर पडत भगतगिरीकडे वळला. त्यातून त्याने लाखोंची माया गोळा केली. मात्र अखेर त्याच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला. या भोदूबुवाने अल्पावधीत उभे केलेले साम्राज्य, त्यातून जोडलेले भक्त आणि मिळवलेली माया इथपर्यंत त्याचा प्रवासही थक्क करणारा आहे.

शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केल्यानंतर बुवाबाजीला आळा बसेल असे वाटले होते. मात्र झालेला कायदा निव्वळ कागदावरच असल्याचे अशा प्रकरणांतून दिसून येत आहे. कारण या कायद्याची अंमलबजावणी करणाऱया यंत्रणांची मानसिकता त्यापद्धतीने असावी लागते. अनिष्ट रूढी परंपरा, फसवेगिरी याला थारा देऊ नका अशा लांबलचक उपदेशाचे डोस देणारे पोलीस दल आणि त्याचे अधिकारीच याच्या उलटी कृती करत असतील तर विश्वास ठेवायचा कुणावर, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. रत्नागिरीत पाटीलबुवाला अटक झाल्यानंतर त्याची भक्त असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक महिला पोलीस अधिकारीच पोलीस कोठडीत असलेल्या आपल्या देवाला म्हणजेच या भेंदू बुवाला चक्क नमस्कार करून आली. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱयांसमोरच घडलेल्या या घटनेने सारेच अचंबित झाले असले तरी हा प्रकार अत्यंत क्लेशजनक आहे.

कायद्याचा बडगा उगारणारे अधिकारीच या भोंदूबुवाच्या पायाशी लोटागंण घालत असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे. रत्नागिरीपासून अवघ्या 12 कि. मी. अंतरावर पोलीस दलातून बाहेर पडलेला कर्मचारी एक मठ स्थापन करतो. तेथे दिवस-रात्र भक्तगणांचा वावर वाढत चालतो, त्यातून त्याचा उंचावत चाललेला आर्थिक स्तर, नाचगाणे हे सर्व एकाच दिवसात घडलेले नाही. अनेक महिने हे सुरू आहे. तरीही याचा संशय कुणाला आला नाही याचेही आश्चर्य वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बुवाचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर पीडित तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. यातून यापुढे या बुवावर कठोर कारवाई होईल. मात्र असले प्रकार थांबवण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याच्या ठोस अंमलबजावणीची गरज आहे. बुवाबाजी प्रकरणे, भोंदूबुवांचे कारनामे हे या जिल्हय़ाला काही नवीन नाहीत. दोन वर्षापूर्वी चिपळुणातील कापसाळ-कामथे गावच्या सीमेवर एका महिलेने असाच मठ स्थापन केला. एका उपाहारगृहात पोळय़ा लाटणाऱया या महिलेने स्वत:च आपण माउलीचा अवतार असल्याचे सांगत अनेक भक्तगण गोळा केले. त्यासाठी तिने स्वत:चा मठ स्थापन करून तेथे आपल्या गुरुच्या पादुका ठेवून समाधीही बांधली. तिने एवढा मोठा भक्तपरिवार गोळा केला की त्यातून लाखोंची माया गोळा केली. तिथेही पोलीस दलातील कर्मचाऱयांपासून वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत सर्वांचीच उठबस तिच्या मठात सुरू झाली. तिच्या भक्ताच्या मुलाच्या अपहरणात ती अडकली आणि तिच्या गुन्हा दाखल झाला. मात्र त्यातून पुढे काहीच झाले नाही. तिने ज्या वास्तू उभारल्या होत्या त्या पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या जागेत होत्या. त्यांना कोणतीही परवानगी नव्हती. अनधिकृतपणे असलेल्या या इमारतीना तोडण्यासाठी स्थानिक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर आजतागायत त्यावर कार्यवाही झालेली नाही.

असे अनेक प्रकार यापूर्वीही विशेषत: रत्नागिरी जिल्हय़ात घडलेले आहेत. अनेक आर्थिक लाभाचे घसघशीत आमिष दाखवून कोकणी जनतेला लुटल्याच्या अनेक घडना अलीकडच्या काळात घडलेल्या असून अजूनही त्या घडत आहेत. मार्केटींग कंपन्यांनी तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. कष्टाच्या पुंजीतील एक एक रु. बाजूला काढून आयुष्याची सुखी स्वप्ने पहात बसलेल्या अनेक कोकणी कुटुंबाना मार्केटींग कंपन्यांनी नेस्तनाबूत केलेले आहे. काही गुंतवणूकदारांनी पुढे येऊन कंपनीवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हे दाखल झालेले असले तरी गुंतवलेला पैसा मात्र हातातून गेला आहे. डोळय़ादेखत फसवणूक होत असतानाही त्यातून कोणताच धडा न घेणे हे आश्चर्यजनक आहे.

Related posts: