|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कंसाच्या मनाचा खेळ

कंसाच्या मनाचा खेळ 

आपल्या मृत्यूची पूर्वसूचना आकाशवाणीद्वारे मिळाल्यामुळे कंस मनोमन पुरता घाबरला. त्याला मृत्यू नको होता आणि आता तर मृत्यूने त्याचे दार ठोठावले होते. तो आता एकाच गोष्टीचा विचार करू लागला, जी गोष्ट त्याला मनोमन नको होती, त्याचा मृत्यू! आता मनाच्या आकर्षणाच्या नियमाप्रमाणे त्याच्या मृत्यूचेच विचार त्याच्या मनात वारंवार येऊ लागले. तो विचार करू लागला की या देवकीचे आठवे मुल कोण असेल? ते केव्हा जन्माला येईल? ते जन्माला येताच मला कसे कळेल? बालपणीच त्याचा काटा मला कसा काढता येईल?

आपल्या मनातील कोणताही प्रबळ विचार त्याच प्रकारचे विचार वारंवार आकर्षित करतो या मनाच्या आकर्षणाच्या नियमाप्रमाणेच हे सारे घडत नव्हते काय? कंसाला नारद मुनींनी हे सांगितले की भगवान स्वतः त्याला मारण्यासाठी अवतार धारण करणार आहेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून गोकुळात अनेक देवतांनी अवतार धारण केले आहेत. कंस आपला पूर्वजन्मीचा इतिहास जाणून होता. आपल्या आधीच्या जन्मातील शत्रूशी म्हणजे भगवान विष्णूशी मुकाबला करण्याची त्याची मनोमन इच्छा होती. पण त्याच्या हातून त्याला मृत्यू नको होता. त्यामुळे आता भगवान विष्णूचा अवतार नको, त्याच्याशी मुकाबला नको, त्याची दृष्टीभेटही नको आणि त्याच्या हातून मृत्यू देखील नको; असे विचार त्याच्या मनात वारंवार येऊ लागले. हे विचार त्याच्या मनात अखंड थैमान घालू लागले. आपल्याला जे नको असते त्याचाच विचार मनात वारंवार येतो हा अनुभव आपल्यालाही अनेकदा येत नाही काय? एक साधा प्रयोग करून पहा. एका आसनावर आराम बसा. मनाचा संकल्प करा की आता मनात पिवळा हत्ती आणायचा नाही. आता डोळे शांतपणे बंद करा. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या बंद डोळय़ांसमोर पिवळा हत्ती लगेच दिसू लागेल. त्याला हाकलवण्याचा प्रयत्न केलात तरी तो मन:चक्षु समोरून सहसा हटणार नाही. आता प्रत्यक्ष जीवनात आपण कधी पिवळा हत्ती पाहिला आहे काय? हत्ती आपण पाहतो तो बहुधा काळय़ा रंगाचा असतो. मुळात हत्ती कधी पिवळय़ा रंगाचा असतो काय? कुणी कधी पिवळय़ा रंगाचा हत्ती पाहिल्याचे आपल्याला सांगितले आहे काय? मग आपल्या मनाच्या डोळय़ांसमोर हा पिवळा हत्ती आला कोठून? हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे. आपल्याला पिवळा हत्ती नको ना! मग आपले मन तो तयार करेल आणि क्षणात आपल्या बंद डोळय़ांसमोर हजर करेल. कंसालाही भगवान नको होते. त्याच्या मनाने हे जाणले होते. मग त्याच्या मनाने आपला आवडता खेळ सुरू केला. उठता बसता, जागा असताना किंवा निजलेला असताना, जेवायला बसलेला असताना की बिछान्यावर पडलेला असताना त्याच्या मनात केवळ भगवंताचाच विचार थैमान घालू लागला. त्याला भगवान नको होते पण त्याचवेळी त्याचे मन भगवंताच्या या अवनीवर अवतरण्याची वाट पाहू लागले.
– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: