|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मागास गावांसाठी ‘ग्राम सामाजिक परिवर्तन’ अभियान

मागास गावांसाठी ‘ग्राम सामाजिक परिवर्तन’ अभियान 

गावांचा साधणार शाश्वत विकास

युवकांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण व रोजगार

कुटुंबांना दारिद्रय़रेषेवर आणणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

ग्रामपंचायत स्तरावर शासनातर्फे आणखी एका अभियानाच्या अंमलबजावणीला प्रारंभ होणार आहे. ‘ग्राम सामाजिक परिवर्तन’ अभियान राबवताना राज्यातील खासगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास साधला जाणार आहे. राज्यातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना दारिद्रय़रेषेवर आणणे तसेच शेतकऱयांचे उत्तन्न दुप्पट करणे आदी उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य हे एक प्रगतशील राज्य आहे. पण राज्यामध्ये नागरी भागात प्रगती झालेली असली तरी ग्रामीण भागात या प्रगतीचा वेग अजूनही मंदावलेला आहे. सामाजिक दृष्टय़ा मागास खेडय़ांचा विकास करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तरीही अजूनही अनेक आव्हानांवर तोडगा काढावयाचा आहे. राज्यातील खासगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांच्या कंपनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून राज्यातील 1 हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही गावे सक्षम बनवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी या अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात केली जाणार आहे.

मागास खेडय़ांचे रुपांतर आदर्श खेडय़ात करून 2018 पर्यंत या कामांचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर संबधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा अभियान परिषद स्थापन करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. गावविकास आराखडा तयार करून त्या गावात जिल्हय़ातील सर्व योजना जोडण्यात येणार आहे. त्या विकास आराखडय़ाचा प्रगती आढावा घेतला जाणार आहे. या विकास आराखडय़ाला जिल्हा अभियान परिषद मंजुरी देणार असून अंमलबजावणीसाठी सर्व योजनांचा समन्वय करणार आहे.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची उद्दीष्टेः

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणे.

पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधारणा करणे.

राज्यातील कुटुंबांना दारिद्रय़रेषेवर आणणे.

युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे.

सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे.

सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे.

गावांमध्ये शुध्द आणि सुरक्षित पाणी पुरवठा करणे.

बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे.

सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे.

Related posts: