भजनीबुवाच्या स्वरांवर पाटीलबाबाचे अश्लील वर्तन

राजापुर शहरातील बुवाच्या चौकशीची मागणी
‘जवा नवीन पोपट’ च्या चालीवर गाणे
तरूणीशी बाबाचे असभ्य हावभाव
प्रतिनिधी /रत्नागिरी
रत्नागिरीनजीकच्या झरेवाडी येथील पाटील बाबाच्या कारनाम्यांचे नवनवे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले असून त्यातून बाबाचे नवे किस्से पुढे येत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक भजनी बुवा ‘जवा नवीन पोपट हा…’ च्या चालीवर गाणे गात असून यावेळी पाटीलबाबा एका तरूणीचा हात हाती घेऊन तिच्याशी अश्लील हावभाव करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा भजनीबुवा व त्या तरूणीचा शोध घेऊन चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान हा भजनीबुवा राजापूर शहरातील असल्याचे समजते.
महिलांसह तमाम भक्तगणांना अपमानास्पद वागणूक देणाऱया या भोंदूबाबा विरोधात आता तक्रारींची संख्या वाढू लागली आहे. बाबाच्या दरबारात होणाऱया भजनाचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक भजनी बुवा ‘जवा नवीन पोपट हा…’ या गीताच्या चालीवर गाणे गात असून त्याचवेळी हा पाटील बाबा एका तरूणीला भजनाच्या ठिकाणी घेऊन सर्वांसमोर तिला उद्देशून अश्लील वर्तणूक करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे ही तरूणीही यामध्ये खुशीने सामील झाल्याचे दिसत असून भजनी बुवाला अधिक चेव आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पाटील बाबाप्रमाणे या पोपटाच्या गाण्यावर बाबांच्या भक्तांसह दस्तुरखुद्द बाबांना फेर धरायला लावणाऱया या राजापुर शहरातील या भजनीबुवाचा व बाबाबरोबर फुगडी घालणाऱया त्या तरूणीचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या बाबाचा झरेवाडीतील मठही अनधिकृत असल्याचे तपासात पुढे आले आहे. कागदोपत्री वेगळे ठिकाण दाखवून तो झरेवाडीत मठ चालवत असल्याचे उघड झाले आहे. आपल्या मठाची नोंदणी या बाबाने धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. मात्र ही नोंदणी सुपलवाडीतील आहे.