|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आम्ही दहशतवाद्यांचे पाठीराखे !

आम्ही दहशतवाद्यांचे पाठीराखे ! 

पाक गुप्तचर अधिकाऱयांचे न्यायालयात प्रतिपादन, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाचक्की

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर संस्था दहशतवाद्यांची पाठराखण करतात, असा भांडाफोड प्रत्यक्ष पाकिस्तानच्याच गुप्तचर अधिकाऱयाने भर न्यायालयात केला आहे. त्यामुळे पाकची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर बेअब्रू झाली. आतापर्यंत दहशतवादाचा आणि आपला संबंध नाही असा आव पाकने आणला होता. तसेच आपणच दहशतवादचे बळी आहोत असा कांगावाही केला होता. तथापि, आता त्याचे पितळ उघडे पडले आहे.

मलिक मुख्तार अहमद शेहजाद हे पाकच्या अधिकृत गुप्तचर विभागात साहाय्यक उपनिरीक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या ज्येष्ठ अधिकाऱयांविरोधात येथील उच्च न्यायलयात न्यायालयात याचिका सादर केली आहे. आपले अधिकारी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना साहाय्य करतात. त्यांचे संरक्षण करतात आणि त्यांचे समर्थनही करतात. अनेक वेळा आपण तक्रार करूनही दहशतवाद्यांविरोधात ते कोणतीही कारवाई करत नाहीत, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे, असे वृत्त पाकच्या द डॉन या दैनिकाने दिले आहे.

या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. याच स्वरूपाची आणखी एक याचिका सध्या उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. दोन्ही याचिका एकत्र करून त्यांची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भक्कम पुरावे

पाक गुप्तचर संस्थांच्या दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांचे भक्कम पुरावे याचिकाकर्त्यांकडे आहेत. ते संबंधितांना सादरही करण्यात आले आहेत. तथापि, अद्याप सदर ज्येष्ठ अधिकाऱयांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच दहशतवादीही मोकाट आहेत. केवळ पाकमधील नव्हे तर अफगाणिस्तान, कझाकिस्तान आणि इतर देशांमधील इस्लामी दहशतवादी संघटनांनाही पाक गुप्तचर संस्थांकडून रसद पुरविली जाते. अनेक दहशतवादी आपण व्यावसायिक असल्याचे दर्शवितात. पण व्यवसायाच्या आडून दहशतवाद माजवतात, अशी वस्तुस्थिती याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

नातेवाईकांची मध्यस्थी

पाक गुप्तचर विभागाचे अधिकारी आपल्या नातेवाईकांमार्फत दहशतवाद्यांच्या संपर्कात  असतात. पंजाब गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा मुलगा दहशतवाद्यांशी आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे व्यवहार करतो. हे थांबविण्यासाठी आपण अनेक ठिकाणी प्रयत्न केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांशीही संपर्क केला. तथापि, कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला आहे, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

तीन दिवसात दोनदा

पाकिस्तानकडून स्वतःचीच कोंडी होण्याचा प्रकार गेल्या तीन दिवसात दोनदा घडला आहे. तीन दिवसांपूर्वी पाकच्या संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी खोटे छायाचित्र दाखवून स्वतःच्या देशाची लाज घालविली होती. आता पाकच्याच गुप्तचर अधिकाऱयाने आपल्या देशात काय चालले आहे, त्याचे सत्य उघड केले आहे.

Related posts: