|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नागरमड्डी दुर्घटनेतून बोध घेणार का ?

नागरमड्डी दुर्घटनेतून बोध घेणार का ? 

कारवार येथील ‘चंडिया’ गाव गोव्यातील किती लोकांना माहीत असेल हा वादाचा प्रश्न आहे. त्या गावात असलेला ‘नागरमड्डी धबधबा’ रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्घटनेतून कायमस्वरूपी गोवेकरांच्या लक्षात राहिला आणि राहील…. ही दुर्घटना अंगावर शहारे आणणारी तर होतीच, शिवाय सर्वांना इशारा देणारी पण होती…, या दुर्घटनेतून आता तरी आपण बोध घेणार का, हाच खरा सवाल आहे…

 

रविवारी गोव्यातून नागरमड्डी धबधब्यावर 50 जणांचा गट गेला होता. या गटात वास्को, फोंडा, राय व कुडतरी गावातील तरुण-तरुणींचा समावेश होता. दुपारच्यावेळी ही सर्व मंडळी नागरमड्डी धबधब्यावर पोहोचली. संथपणे वाहणाऱया धबधब्याच्या पाण्यात उतरण्याचा मोह काहींना आवरता आला नाही. हा मोहच सहा जणांचे बळी घेणारा ठरला. अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. आपले सहा सोबती पाण्यात वाहून जात आहेत हे अंगावर शहारे आणणारे चित्र इतरांना हताशपणे पहावे लागले.

या दुर्घटनेचा व्हीडिओ अवघ्या काही मिनिटातच व्हायरल झाला. सहाजण पाण्यात एका दगडावर उभे राहिलेले व इतर सर्वजण जीव वाचविण्यासाठी धडपडत धबधब्याच्या पाण्यातून बाहेर पडतानाचा हा व्हीडिओs होता. ‘ते वाहून जातात ना… जाऊ द्या, तुम्ही वर या’ असे शब्द या व्हीडिओच्या माध्यमातून ऐकू येतात. हे शब्द जरा धोक्याचा इशारा देणारे नक्कीच वाटतात, कारण अडचणीत सापडलेल्यांना मदत न करता, आपण आपला जीव वाचवू या, स्वतःचा जीव का म्हणून धोक्यात घालूया… असाच त्याचा अर्थ निघाला…

कारवार येथील चंडिया गावातील नागरमड्डी धबधब्याचे नाव असंख्य गोवेकरांनी बहुद्या पहिल्यांदाच ऐकले. ज्या धबधब्यावर स्थानिक चंडिया ग्रामस्थ कधी जाणे पसंत करत नाही, अशा धबधब्यावर गोव्यातील 50 जणांचा गट दाखल होतो व एका दुर्घटनेत सापडतो हे भयानक सत्य होते. मुळात आपल्याला ज्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती नसते अशा ठिकाणी जाण्याचे धाडस करूच नये. असे धाडस करणे अंगलट येऊ शकते, हेच या दुर्घटनेतून स्पष्ट झाले.

नागरमड्डी धबधब्याच्या परिसरात जोरदार पाऊस झाला व संथपणे वाहणाऱया पाण्याच्या पातळीने आक्रमक रूप धारण केले. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की, या प्रवाहासोबत पाषाणी दगडसुद्धा वाहून गेले. प्रचंड मोठा आवाज करत हे पाणी आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ज्यांनी जीव वाचविण्यासाठी धबधब्याच्या पाण्यातून काढता पाय घेतला तेच सुखरूप राहिले. या सहा जणांनी जर थोडी  सतर्कता दाखविली असती तर ही भयानक दुर्घटना घडलीच नसती. अवघ्या 20 मिनिटात पाणी ओसरले आणि जणू काही घडलेच नाही अशी पूर्ववत स्थिती निर्माण झाली. पण मधे काही मिनिटातच जे काही अतर्क्य घडले, ते कटू सत्य होते.

नागरमड्डी धबधब्यावर जाण्यास मनाई करणारा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष करून धबधब्याच्या पाण्यात उतरणे मुळातच चुकीचे होते. त्यात हा धबधबा अडचणीच्या ठिकाणी असल्याने मोठी जोखीम पत्करणे योग्यही नव्हते. पण, गोव्यातून गेलेल्या 50 जणांच्या गटाला याचे भान राहिले नाही. त्यांनी सरळ पाण्यात उतरणे पसंत केले. पाण्यात उतरलेल्या किती जणांना पोहता येत होते हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. जर पोहता येत असेल तर आपण जीव कसातरी वाचवू शकतो. जर पोहताच येत नसेल तर पाण्यात उतरणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे असते. नेमके हेच या ठिकाणी घडले!

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या सहा जणांपैकी दोन महिलांचे मृतदेह त्याच दिवशी हाती लागले. उर्वरित चार जणांपैकी तिघांचे मृतदेह दुसऱया दिवशी तर एक मृतदेह तिसऱया दिवशी हाती लागला. या दुर्घटनेतून कोणाची माता, कुणाचा पती  कुणाची पत्नी यांचे बळी गेले. ऐन तारुण्यातील कर्तीसवरती मुले गेली. आज त्या कुटुंबीयांवर काय परिस्थिती आली असेल… याचा विचार जरी केला तरी मन  सुन्न होऊन जाते.

या दुर्घटनेने आज अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात नागरमड्डी धबधब्यावर जाण्याचा निर्णय कोणी घेतला? या संपूर्ण प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण? या धबधब्याचा पूर्व इतिहास कुणाला माहिती होता का? धबधब्यावर जाण्यास मनाई केली असताना देखील धोका का पत्करला? या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार का? पण यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर आज शोधून सापडणार नाही हे नक्की! कारण, कुणी जबाबदारी घेतली तर तो अडचणीत येऊ शकतो, ज्यांचे दुर्दैवी बळी गेले, त्यांचे कुटुंबीय गप्प बसणार का?

गोव्यातील दूधसागर, हरवळे व नेत्रावळी येथील धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. त्यातील बहुसंख्य पर्यटकच होते. पर्यटकांना या धबधब्याविषयी सखोल माहिती नसल्याने ते या धबधब्यात बुडाले. पण, सहा गोवेकर एकाच वेळी वाहून जाण्याची ही पहिलीच मोठी दुर्घटना ठरली आहे. या दुर्घटनेत बळी गेलेल्या फियोना पाशेको हिला दोन मुली आहेत. एक आठ वर्षाची तर दुसरी पाच वर्षांची. फियोनाच्या अचानक जाण्याने या दोन मुलींचे मायेचे छत्र हरपले. आज या दोन मुली आपल्या आईविना पोरक्या आहेत. त्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी आज त्यांचे वडील जॉन्सनवर आली आहे.

दोन संसार उद्ध्वस्त

करमणे-केरी, फोंडा येथील समीर चंद्रकांत गावडे या युवकाचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आत्ताच कुठे त्यांचा संसार फुलत होता. मात्र, नागरमड्डी दुर्घटनेत समीरचा बळी गेल्याने त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. अशाच पद्धतीने पाच महिन्यापूर्वी विवाह झालेल्या फ्रान्सिला पेरीस हिचा देखील संसार उद्ध्वस्त झाला. तर सिद्धेश च्यारी (22) व रेणुका मरगुट्टी (23) या ऐन तारुण्यातील युवक-युवतीचा बळी गेला. मार्सेलिना इस्तेबेरो ही आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पहात असतानाच तिची स्वप्ने मातीमोल ठरली. या दुर्घटनेतून भविष्यात इतरांनी बोध घेणे आवश्यक बनले आहे. आपण कुठे जाणार, त्यासाठी आपली काय तयारी आहे, तसेच जोखीम न पत्करणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तरी नागरमड्डीची पुनरावृत्ती टाळणे निश्चितच शक्य आहे.

Related posts: