|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विज्ञान आणि श्रद्धा

विज्ञान आणि श्रद्धा 

अध्यात्म आणि विज्ञान यात द्वैत आहेच असे म्हणतात. असेलही. मी स्वतःला बुद्धिवादी म्हटलं की समोरचा माणूस लगेच मला नास्तिक म्हणतो. पण श्रद्धाळू माणूस विज्ञानाने दिलेल्या कोणत्याही सुविधांना नाकारीत नाही. 

मानवाच्या पूर्वजांना पेट्रोलवर चालणारी मोटर किंवा विजेवर चालणारी आगगाडी ठाऊक नव्हती. ध्वनिवर्धक, रेडिओ, टीव्ही किंवा संगणक ठाऊक नव्हते. विसाव्या शतकापासून एकेक शोध लागत गेले. ते सर्व आस्तिक लोकांनी देखील स्वीकारले. म्हणजे मोटर किंवा रेल्वे किंवा विमानात बसून लोक तीर्थयात्रेला जाऊ लागले. आपापल्या प्रार्थना दूरवर ऐकू जाव्यात म्हणून ध्वनिवर्धक वापरू लागले. रेडिओ आणि टीव्हीवरून आपल्या विचारांचा प्रसार करू लागले. व्हॉटस्एपवरून विविध बुवांच्या बाबांच्या महतीच्या आख्यायिका एकमेकांना फॉरवर्ड करू लागले.

भल्या सकाळी फिरायला जाताना वाटेत कोणतंही हॉटेल लागलं तर एक गोष्ट हमखास दिसते. धंद्याला सुरुवात होण्यापूर्वी चहाचा एक कप रस्त्यावर ओतून देतात. फक्त हॉटेलवालेच असं करतात. बँकवाले, सोनार किंवा रेडीमेड कपडय़ांचे दुकानदार वगैरे लोक असं काही करीत नाहीत. नाहीतर रोज सकाळी रस्त्यावर नोटा, सोन्याचांदीची नाणी, शर्ट्स, साडय़ा वगैरे पदार्थ फेकून दिलेले आढळले असते.

भल्या सकाळी दिसणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे लहान मुलं तारेत गुंफलेल्या लिंबू-मिरचीच्या माळा घेऊन हिंडताना दिसतात. दुकानदार, फेरीवाले आणि वाहनचालक त्यांच्याकडून या माळा रोज विकत घेतात आणि दर्शनी जागेवर टांगतात. असं केल्याने शत्रूची दृष्ट लागत नाही अशी त्यांची श्रद्धा असते. शिवाय काही वेळा लिंबू आणि मिरच्यांची माळ रस्त्यावर फेकलेली आढळते. त्यातली लिंबे आडवी चिरून त्यात हळद-कुंकू भरलेले असते. कोणाची तरी ‘दृष्ट काढून’ ही लिंबे-मिरच्या रस्त्यावर फेकलेली आढळतात. बाजारात ऋतुमानानुसार लिंबे आणि मिरच्यांचे भाव चढे असोत की घसरलेले, यात कधी खंड पडत नाही.    

काही दिवसांपूर्वी एक अजब प्रकार पाहिला. एका रिक्षाच्या काचेवर तेजःपुंज लिंबू आणि मिरच्या दिसल्या. जवळ जाऊन पाहिल्यावर समजले की प्लास्टिकच्या होत्या. चालकाला विचारल्यावर तो म्हणाला, “रोज रोज विकत घेण्यापेक्षा एकदाच हे प्लास्टिकचं घेऊन टाकलं.’’

झकास आहे की. विज्ञानानुसार प्लास्टिक अविनाशी आहे. त्यामुळे ही लिंबू-मिरच्यांची माळ खूप दिवस टिकेल आणि तोवर ताज्या लिंबांची आणि मिरच्यांची उधळपट्टी टळेल. श्रद्धा असावी तर अशी विज्ञानाधि÷ित.

Related posts: