|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सेल्फीमग्न माणुसकी

सेल्फीमग्न माणुसकी 

घटना एक. बेंगलोरजवळच्या जयानगर नॅशनल कॉलेजचे तरुण पोहण्यासाठी तलावात उतरले. जलतरणाचा आनंद लुटतानाचा क्षण त्यांनी उत्साहाने  मोबाईल पॅमेऱयात टिपला. पोहून बाहेर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपला एक विश्वास नावाचा मित्र पाण्यात बुडाला आहे. आपण सेल्फी काढण्याच्या आनंदात मग्न  होतो तेव्हा विश्वास पाण्यात बुडत होता. सेल्फी काढताना मित्रांनी थोडसे भान राखले असते तर विश्वासचा मृत्यु टळला असता. घटना दुसरी. काही दिवसांपूर्वी नागपूरमधल्या तलावात नौकाविहार करण्यासाठी अशीच तरुण मुले गेली होती. आपण किती आनंद लुटतो आहोत हे सांगणारी व्हिडिओ क्लिप त्यांनी मित्राला पाठवली. त्यानंतर थोडय़ाच वेळात नौका उलटून या तरुणांना जलसमाधी मिळाली. घटना तिसरी. आंबोली घाटात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही तरुण गेले होते. निसर्गाचा आनंद घेत असतानाच त्यांचे भान सुटले आणि दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. दूरवर त्यांचेच काही मित्र मोबाईलवर त्यांचे चित्रिकरण करत होते. त्यात दरीत कोसळण्यापूर्वी हे तरुण कसे बेभान झाले होते ते समजत होते. त्याचबरोबर व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱया मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न कसा केला नाही. धोक्याची जाणीव कशी करून दिली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. घटना चौथी. पुण्यामध्ये  अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाला. तो वेदनांनी तडफडत होता आणि तिथे जमलेली गर्दी ही घटना मोबाईलवर शूट करीत होती. त्यापैकी एकालाही असे वाटले नाही की त्या तरुणाला तातडीने
हॉस्पिटलमध्ये न्यावे. या चार घटनातून सेल्फीमग्न होत निघालेल्या, माणुसकी, संवेदनशीलता हरवत निघालेल्या समाजाचे विदारक दर्शन होते. कोणतेही तंत्रज्ञान आत्मघातकी ठरते  तेव्हा  त्यांच्या वापराबाबत फेरविचार करावा लागतो. मानवी संस्कृतीचा विकास तंत्रज्ञानाच्या आधारानेच झाला हे कुणालाच नाकारता  येणार नाही. शोध  मग तो शेतीचा  असो की चाकाचा, प्रत्येक तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून मानवाने  प्रगती केली. निसर्गातल्या संकटांवर मात केली. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने पृथ्वीवर आपले राज्य निर्माण केले. पण ही झाली एक बाजू. त्याची दुसरी बाजू तेवढीच महत्त्वाची. माणूस विचारशील प्राणी असला तरी प्रत्येकवेळी तो विचारानेच वागतो असे नाही. त्याच्यातला स्वार्थ केव्हा केव्हा प्रबळ बनतो.  त्याला कधी धर्माची, खोटय़ा राष्ट्रप्रेमाची, साम्राज्यवादातून आलेल्या सत्तेची जोड मिळते. त्यातून त्याचे विवेकाने जगण्याचे भान हरपते. कोणत्याही तंत्रज्ञानाचा मूळ हेतू मानवी जगणे अधिक सुखकर, आनंदाचे व्हावे असाच असतो. मात्र तसा तो राहात नाही हे वास्तव आहे. युरोपातल्या औद्योगिक क्रांतीने परंपरात राज्यव्यवस्थेला धक्का दिला. धर्माच्या वर्चस्वाने अंधारयुग संपून विज्ञाननिष्ठ समाज उभारणीला गती मिळाली. तंत्रज्ञानाचे रूपान्तर भांडवलनिर्मित बाजारपेठीय व्यवस्थेत वेगाने होण्याची प्रक्रिया औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाली. मात्र साम्राज्यवादी सत्ता संघर्ष हे त्याचेच दुसरे रूप होते.  पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्ध ही त्याचीच परिणती आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांमध्ये  प्रचंड  मनुष्य आणि वित्तहानी होऊनसुद्धा माणसाला शहाणपण आले असे अजिबात नाही. तसे असते तर  हिरोशिमा किंवा नागासाकीत जे घडले ते पाहून कोणत्याही सुविचारी माणसाला किंवा राष्ट्राला अणुबाम्बची निर्मिती करावे असे वाटले नसते. चित्र नेमके उलट दिसते. शीतयुद्धांच्या समाप्तीनंतरही राष्ट्राराष्ट्रांमधील अण्वस्त्र स्पर्धा वाढत गेली असून त्याने जगभरातील माणसाला सतत असुरक्षित ठेवले आहे. अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा मूळ हेतू अजिबातच साध्य झालेला नाही असे नव्हे.  औद्योगिक क्रांतीने जसे मानवी जीवन गेल्या दोन शतकांच्या कालावधीत बदलून टाकले, तसेच मोठे परिवर्तन 21व्या शतकातल्या पहिल्या 2 दशकांमध्ये मोबाईल क्रांतीने केले  आहे. अंतराळ संशोधन आणि उपग्रहातील तंत्रज्ञानामुळे त्याचा वेगसुद्धा थक्क करणारा आहे. मोबाईल आणि संवाद माध्यमातल्या बदलत्या तंत्रज्ञानाने बघता बघता संपूर्ण समाजजीवन व्यापून टाकले आहे. भांडवली,  व्यापारी व्यवस्थेला हा बदल अधिक नफा मिळवून देणारा असल्याने  त्याची पद्धतशीरपणे गरज वाटावी अशी बाजारपेठ तयार केली गेली आहे. मोबाईल तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी कालबाह्य ठरविल्या. विकत घ्या, वापरा आणि फेकून द्या अशी संस्कृती रुजवली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे काही सामाजिक दुष्परिणाम होतातच.  मोबाईलच्या संस्कृतीतून जो नवा समाज आकाराला येतो आहे, त्याचा थोडा बारकाईने विचार केला तर पहिल्यांदा लक्षात येणारी बाब म्हणजे समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.  सुरुवातीला आपण ज्या चार प्रातिनिधिक घटनांचे संदर्भ आपण पाहिले त्यातून आपणाला भान हरवलेल्या  मानवी वृत्तीचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेकडे आपण ज्या संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे तसे प्रत्यक्ष कृतीतून दिसत नसल्याचे दिसते. समोर एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत तडफडते आहे. मदतीची याचना करते आहे, त्याकडे  इतरांचे लक्ष जात नाही किंवा त्या घटनेतले गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही हे केवळ मनोरुग्ण समाजातच घडू शकते. दुर्दैवाने जगभरातच अशा लोकांची संख्या वाढते आहे. मात्र कालचक्र उलटे फिरविता येणार नाही. पण तंत्रज्ञानाच्या वापराचे किमान भान राखले तरी धोके टाळता येतात. मोबाईल कोणताही असला तरी ते वापरणारे हात आणि बोटे यावरील मेंदूचे नियंत्रण आपलेच असते. सेल्फी काढणे गैर नाही. पण  दुसऱयाच्या मरणाचा अंतिम क्षण चित्रबद्ध करण्याचा अपराध आपल्या हातून चुकूनही होणार नाही याचे किमान भान माणूस म्हणून निश्चितपणे राखता येते. कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत जपावा असा माणुसकीचा धर्म यापेक्षा वेगळा तो काय असतो?

 

Related posts: