|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विद्यार्थ्यांनी अनुभवले मच्छीमारी व्यवसायाचे विश्व

विद्यार्थ्यांनी अनुभवले मच्छीमारी व्यवसायाचे विश्व 

वार्ताहर / मालवण :

 नववी व दहावीला व्यवसाय मार्गदर्शन आणि नव्यानेच नववीसाठी स्वविकास व कलारसास्वाद या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयांना अनुसरून येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ठरवा लक्ष, घडवा भविष्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मालवणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मासेमारी व्यवसायाचे विश्व अनुभवले.

विद्यार्थ्यांना मासेमारी व त्याचे पूरक व्यवसाय यांची तोंडओळख व्हावी, मासेमारी व्यवसाय करणाऱयांविषयी आपुलकी व आदरभाव वाढावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय गणेश इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मेघना जोशी, महेंद्र पराडकर, गंगाराम आडकर, यशवंत खंदारे, दिलीप घारे, नारायण धुरी, चारुशिला आचरेकर, हेमेंद्र मेस्त, जितेंद्र शिर्सेकर, मिलन ताम्हणकर, सुनील ताम्हणकर आदी उपस्थित होते.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकवीरा आई हे कोळीगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गंगाराम आडकर, यशवंत खांदारे यांनी विद्यार्थ्यांना जाळय़ांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. दिलीप घारे यांनी सागर किनारे, रापण संघ, रापण व रापण हंगाम याविषयी माहिती दिली. चारूशिला आचरेकर यांनी माशांपासून तयार केल्या जाणाऱया विविध खाद्य पदार्थांची माहिती दिली.

महेंद्र पराडकर यांनी शाश्वत मासेमारी व सागरी पर्यावरण याबाबत माहिती दिली. कार्यक्रमासाठी नारायण धुरी, हेमेंद्र मेस्त व त्यांच्या सहकाऱयांनी प्रशालेच्या स्टेजची मासेमारीच्या साधनांचा वापर करून आकर्षक रितीने सजावट केली. गौरी सातार्डेकर यांनी अभिप्राय व्यक्त केला. प्रास्ताविक मेघना जोशी यांनी केले.