|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी

चंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी 

प्रतिनिधी/ चंदगड

चंदगड-हेरे मार्गावर हंबेरे फाटय़ावर चंदगड आगाराच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. जखमीत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश असून हा अपघात बुधवारी सकाळी 6.20 वाजता घडला. बसचालक आर. जी. थोरात याच्या विरोधात चंदगड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

अपघातात जखमी झालेले प्रवासी शिप्पूर, कोळींद्रे, नांदवडे गावचे असून त्यांच्यावर चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एम. एच-14 बी. टी. 730 या बसवरील चालक आर. जी. थोरात आपल्या ताब्यातील हेरे ते चंदगड बस अत्यंत बेजबाबदारपणे चालवून तो अपघातास कारणीभूत ठरला. समोरून येणाऱया चंदगड ते गुडवळे (एच.एच.12 सी.एच. 7710) या बसची समोरासमोर धडक झाली. गाडीची काच फुटून केवळ एक हजाराचे नुकसान झालेले असले तरी अचानक दोन्ही गाडय़ांनी लावलेल्या बेकमुळे गाडय़ांतील प्रवासी जखमी झाले. गुडवळेकडे जाणाऱया बसमध्ये प्रवासी कमी होते. परंतु हेरे कडून चंदगडकडे येणाऱया गाडीत विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. या अपघातात पवन पाटील, प्रसाद कुंदेकर नांदवडे, विशाल पाटील शिप्पूर, मनिषा रेडेकर नांदवडे, तनुजा मळवीकर नांदवडे, सुस्मीता नामदेव कुट्रे, माधुरी सुतार नांदवडे, मुक्ता शिंदे नांदवडे, सुजाता गावडे नांदवडे, संजीवनी कुराडे नांदवडे, ज्योती पाटील नांदवडे, तेजस्वीनी आनगुडे कोळींद्रे, प्रतिक्षा पाटील कोळींद्रे, विद्या गावडे नांदवडे, तेजस्वीनी गावडे नांदवडे, प्रमिला गावडे खालसा सावर्डे, अजय जेलुगडेकर खा. सावर्डे, सुरेखा गावडे नांदवडे, रोहिणी आपटेकर नांदवडे, मंदाकिनी तांबाळकर सुळये, मनिषा शिंदे नांदवडे, अश्विनी गावडे नांदवडे यांच्यासह तीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघाताची वर्दी खालसा सावर्डे येथील विद्यार्थी अजय नंदू जेलुगडेकर यानी चंदगड पोलीसात दिली असून तपास सहाय्यक फौजदार श्री. मुजावर करीत आहेत. चंदगड-हेरे हा रस्ता अरूंद असून याचे भान नसलेले वाहक बेधुंदपणे बसेस चालवत असल्यामुळे अशा अपघाताना निमंत्रण मिळते. जखमीवर चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. ऍड. संतोष मळवीकर यांनी रूग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने यांच्याशी सुसंवाद साधून रूग्णांची पहाणी केली. या अपघाताबाबत चंदगड आगारांच्या चालकांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.