|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वे ओव्हरब्रिज कामासाठी जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

रेल्वे ओव्हरब्रिज कामासाठी जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी 

प्रतिनिधी / बेळगाव

ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. रेल्वे ओsव्हरब्रिजसंदर्भात उद्भवलेल्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एस. झियाउला यांनी अधिकारी वर्गासह पाहणी केली. त्यानंतर पर्यायी रहदारी व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना करून त्यानंतर रेल्वे ओव्हरब्रिज कामाबाबत दोन दिवसानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. दरम्यान ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्याच्यादृष्टीने झाडे-झुडपे हटविण्यासह मार्किंग करण्यात आले.

खानापूर रोड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हटविण्यासाठी आवश्यक हालचाली रेल्वे प्रशासनाने चालविल्या आहेत. मात्र वाहतूक नियोजन करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या तीन दिवसापासून जिल्हा प्रशासनाने रेल्वे ओव्हरब्रिजवरील वाहतूक बंद ठेवली आहे. अचानकपणे वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने पहिल्यादिवशी वाहनधारक तसेच वडगाव, शहापूर, टिळकवाडी आणि येळळूर परिसरातील रहिवाशांची गैरसोय झाली. याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाने केली. दुसऱया दिवशी बाजारपेठेची सुट्टी असल्याने पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण जाणवला नाही. मात्र काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. समस्येचे निवारण करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी  दोन दिवसापासून सातत्याने प्रयत्नशील आहेत..

दोन दिवसापासून रेल्वे ओव्हरब्रिज बंद ठेवण्यात आल्याने याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी आणि रेल्वे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंते एस. शेट्टी यांच्यासह शहर अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर, शहर अभियंते आर. एस. नायक आणि कंत्राटदार शिवकुमार हे बुधवारी सकाळी गोगटे सर्कल येथे पाहणी केली. यावेळी रेल्वे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंते एस. शेट्टी यांच्याकडून ओव्हरब्रिज उभारणीच्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर गोगटे सर्कल परिसरात वाहतुकीबाबत कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत का? अशी विचारणा पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांच्याकडे केली. याठिकाणी कोणतीच समस्या नसल्याची माहिती उपायुक्त रेड्डी यांनी दिली. त्यानंतर काँग्रेस रोडमार्गे  पहिले रेल्वे गेट परिसराला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आल्याने याबाबत निर्माण होणाऱया समस्या जाणून घेतल्या. पहिले रेल्वे गेट परिसरात खड्डे पडले असल्याचे पाहणीवेळी निदर्शनास आले. याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे खात्याने रस्त्याशेजारी भिंत बांधली आहे. सदर भिंत हटविण्यात आल्यास रस्त्याची रूंदी सहा फुटाने वाढु शकते, अशी माहिती सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी यावेळी दिली. यामुळे भिंत हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांना दिला. तसेच रेल्वे फाटक आणि काँग्रेस रोडवरील खड्डे पेव्हर्स ब्लॉक घालून तातडीने बुजविण्याची सूचना केली. पहिला रेल्वे गेट येथील रहदारीबाबत माहिती घेवून आवश्यक सूचना पोलीस अधिकाऱयांना दिल्या. या परिसरात शाळा व महाविद्यालये असून बाजारपेठदेखील असल्याने मंडोळी रोडने येणाऱया नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडावे लागते. यामुळे पादचाऱयांच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आखण्याची गरज असल्याची बाब सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे याबाबत तोडगा काढण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. काँग्रेस रोड आणि रेल्वे मार्गावर स्कायवॉकची उभारणी केल्यास पादचाऱयांची सोय होवू शकते, अशी सूचना पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी केली. पादचाऱयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली.

 पाहणीवेळी दुसरा रेल्वे गेट परिसरातील वाहतूक नियोजनाची पाहणी जिल्हाधिकाऱयांनी केली. त्याठिकाणी अर्धा तास थांबून वाहनधारकांना निर्माण होणाऱया समस्यांची माहिती घेतली. फाटक बंद होताना सायरन वाजविण्याची सूचना रेल्वे गेटमनला केली. याठिकाणी असलेले फाटक बंद करून पाहणी केली असता सायरनचा आवाज वाहनधारकांना ऐकू येत नसल्याने तिन्ही रेल्वे फाटकावर मोठय़ा आवाजाचे सायरन बसविण्याचा आदेश रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांना दिला. यावेळी तिसरे रेल्वे गेट, गोवावेस महात्मा फुले रोड, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर रोड उड्डाणपूल, शनिमंदिर आदी परिसरात फेरफटका मारून आढावा घेतला. पाहणीवेळी अधिकाऱयांना आवश्यक सूचना करून तातडीने अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिला. या पाहणीवेळी माजी महापौर महेश नाईक, नगरसेवक अनंत देशपांडे, माजी महापौर किरण सायनाक, नगरसेवक ऍड. रतन मासेकर आदींसह महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते आर. ए. शेट्टर व रेल्वे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

   उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी या नात्याने रेल्वे प्रशासनाने मार्ग बंद करण्यासाठी परवानगी मागितली आहे. पण नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांची माहिती घेतल्याखेरीज परवानगी देता येत नाही. यामुळे वाहतूक वळविण्याची सूचना पोलीस प्रशासनाला केली होती. पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि रेल्वे खाते आदींकडून सर्व माहिती घेवून त्यानंतर परवानगी दिली जाणार आहे. याकरिता दोन दिवसापासून ओव्हरब्रिजवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक वळवून निर्माण होणाऱया समस्यांची माहिती घेतली जात आहे. आणखीन दोन दिवस चाचणी घेऊन त्यानंतर याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी सागितले.