|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिडकल जलाशय पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यास मंजुरी

हिडकल जलाशय पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यास मंजुरी 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराला हिडकल जलाशयामधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या 12 एमजीडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. ही क्षमता 18 एमजीडीपर्यंत वाढविण्याची तरतूद हिडकल योजना राबविताना करण्यात आली होती. पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यासाठी विद्युतपंपाची क्षमता वाढविणे आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी 32 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर महापालिका सभागृहात चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव राबविण्यासाठी 32 कोटी खर्च असून अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्याचा विचार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते सी. एन. करिअप्पा यांनी सभागृहात मांडला. 12 एमजीडी पाणी पुरवठा केला जात असून 18 एमजीडी पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने जलवाहिन्या बदलणे, विद्युतपंप बदण्याकरिता 32 कोटीचा खर्च आहे. प्रस्ताव राबविण्यासाठी एक वर्षाचा अवधी लागणार आहे. प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिल्यास शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यास सोयीचे होईल, असे करिअप्पा यांनी सागितले.

हा प्रस्ताव 2014 पासून प्रलंबित असून त्यावेळी पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यासाठी 22 कोटी निधीची आवश्यकता होती. पण आता प्रस्ताव 32 कोटीवर गेला असल्याने खर्चाची चाचपणी करण्यात यावी, अशी सूचना आमदार फिरोज सेठ यांनी केली. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने पाणी पुरवठा क्षमता वाढविण्याची गरज असल्याने प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना माजी महापौर किरण सायनाक यांनी मांडली. शहरातील लोकसंख्या वाढत असल्याने हा प्रस्ताव राबविणे आवश्यक असल्याने याचा विचार व्हावा, असे मत ऍड. रतन मासेकर यांनी मांडले. याकरिता महापालिकेने निधीची तरतूद टप्प्याटप्प्याने करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सागितले.

चोवीस तास पाणी पुरवठा योजना राबविण्यास चार वर्षाचा अवधी लागणार आहे. पण शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने बसवनकोळळ जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात आला आहे. याचपद्धतीने पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यासाठी विद्युतपंपांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. याकरिता निधीची तरतुद करण्यास कोणतीच हरकत नाही. याकरिता एसएफसी अनुदानमधून निधीची तरतूद करता येते. यामुळे हा प्रस्ताव राबविण्यास कोणतीच हरकत नसल्याचे मत महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी मांडले. यामुळे सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला..