|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वादावादीमुळे सभागृहाचे वातावरण तापले

वादावादीमुळे सभागृहाचे वातावरण तापले 

प्रतिनिधी / बेळगाव

विषयपत्रिकेवरील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात यावी, वॉर्डमधील समस्या महापौर-उपमहापौर आणि आयुक्तांच्या कक्षात मांडाव्यात, अशी सूचना महापौर संज्योत बांदेकर यांनी केली. यावर आक्षेत घेत डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी महापौरांच्या समोर विषयपत्रिका फेकून ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार वादावादी झाली. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतरच नगरसेवकांच्या समस्या जाणून घेण्याची सूचना सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी केली.

अखेर काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकून सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. सभागृहात चर्चा करताना अशाप्रकारे आसन सोडून महापौर-उपमहापौर आसनासमोर ठाण मांडणे अयोग्य आहे. यामुळे प्रत्येक सदस्याने सभागृहाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणी नगरसेवक  सभागृहाचा सन्मान करत नसल्यास नगरसेवकांना निलंबित करण्याचा अधिकार महापौरांना आहे. यामुळे या अधिकाराचा वापर करून गैरवर्तन करणाऱया प्रत्येक नगरसेवकावर कारवाई करावी, अशी सूचना आमदार संभाजी पाटील यांनी मांडली.

मजगाव येथे शिक्षण संस्थेची इमारत बांधण्यासाठी आमदार संजय पाटील यांनी महापालिकेकडे अर्ज दिला आहे. यामुळे याबाबत सभागृहात हा विषय चर्चेला घेण्यात आला होता. हा प्रस्ताव सभागृहात घेण्याची गरज काय? असा मुद्दा आमदार फिरोज सेठ यांनी उपस्थित केला. यामुळे याबाबत शासनाचा आदेश असल्याची माहिती नगरयोजनाधिकारी ए. एस. कांबळे आणि महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. यामुळे शिक्षण संस्थांना इमारत बांधकाम परवानगी देण्याचा विषय महापालिका सभागृहात चर्चेला घेता येतो की नाही, याबाबत जोरदार चर्चा झाली. हा कायदा अन्यायकारक असल्याने अटी घालून इमारत बांधकाम परवानगी देण्यास काहीच हरकत नसल्याचा मुद्दा सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी मांडला. यामुळे कायद्याच्या चौकटीत व सरकारी आदेशानुसार इमारत बांधकाम परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रद्धांजली

   माजी सभापती रामभाऊ पोतदार यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव नगरसेवक अनंत देशपांडे यांनी मांडला. राजकीय व सामाजिक चळवळीत रामभाऊ पोतदार यांचा सहभाग होता, असे सांगून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रामभाऊ पोतदार यांचा परिचय आणि राजकीय प्रवासाची माहिती देत माजी महापौर किरण सायनाक, सत्ताधारी गटनेते पंढरी परब, विरोधी गटनेते यांनी श्रद्धांजली वाहिली. नाटककार ऐणगी बाळाप्पण्णावर व पत्रकार गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव लेखा स्थायी समिती अध्यक्षा सरला हेरेकर यांनी मांडला. यावेळी मौन पाळून सभागृहाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related posts: