|Thursday, December 13, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अंधश्रद्धेचे विधेयकही मांडले श्रद्धेने

अंधश्रद्धेचे विधेयकही मांडले श्रद्धेने 

एकूण 7 वर्षे कारावास आणि 5 ते 50 हजार रु.पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा लागू झाला तर अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची सुटका होणार आहे.

 अंधश्रद्धा प्रतिबंधक विधेयकाला बुधवारी मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. आता हिवाळी अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे विधेयक रखडले होते. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर बरीच चर्चा सुरू आहे. आम्ही श्रद्धेवर आळा घालणार नाही. समाजाला रसातळाला पोहचविणाऱया अंधश्रद्धेवर कायद्याची वेसण लावणार आहे अशी भूमिका सरकारने मांडली आहे. वास्तू, फलज्योतिष, भजन, कीर्तन, इंगळय़ा, जत्रा, पात्रांना या विधेयकातून वगळण्यात आले आहे.  उष्टय़ा पत्रावळय़ांवरून लोटांगण घालणारे ‘मडेस्नान’, नग्नपूजा, भानामती, जादूटोणा पूजेच्या नावाखाली होणारे अनाचार, भूत-प्रेत बाधेच्या नावाखाली होणारे शोषण, देवा-धर्माच्या नावाने होणारे लैंगिक शोषण आदींवर आता कायद्याने बंदी येणार आहे.

बुधवारी एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीत अंधश्रद्धा प्रतिबंधक विधेयकावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी दुसरीकडे भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते के. एस. ईश्वरप्पा हे बेंगळूर येथे प्रत्यंगिरा होमाला चालना देत होते. शत्रूसंहारासाठी त्यांनी हा होम केल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. अन्य पक्षांपेक्षा भाजपमध्येच ईश्वरप्पा यांना शत्रू खूप आहेत. येडियुरप्पा आणि ईश्वरप्पा यांच्यातील संघर्ष थांबता थांबेना अशा परिस्थितीत ईश्वरप्पा यांनी कोणत्या शत्रूंचा संहार करण्यासाठी प्रत्यंगिरा होमात समीधा अर्पण केल्या हे प्रत्यंगिरा देवीच जाणे! राजकीय नेत्यांनी राजकारणात आपले स्थान बळकट करण्यासाठी कोणताही विधी केला तरी ते योग्य आणि रास्तच असते. केवळ सर्वसामान्य नागरिक अशा अंध आचरणांना बळी पडू नये ही त्यांची अपेक्षा असते. म्हणून दुरुस्ती विधेयकात होम-हवन वगळण्यात आले आहे. रोज सकाळी टीव्ही सुरू केला की, एखादा बाबा, बुवा आज कोणत्या राशीतील व्यक्तींनी काय करावे, काय करू नये, याचा सल्ला देताना दिसतात. म्हणून अशा कार्यक्रमांवरही बंदी घालण्याची मागणी कर्नाटकातील पुरोगामी विचारवंतांनी केली होती. आता दुरुस्ती विधेयकात फल ज्योतिष वगळण्यात आले आहे. वास्तू ज्योतिष वगळल्याने आता या विधेयकाला फारसा विरोध होणार नाही. याची काळजी घेऊनच राज्य सरकारने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. नागरिकांच्या श्रद्धेला ठेच न पोहचवता अंधश्रद्धेवर प्रहार करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. विधिमंडळात विधेयक मांडण्याआधी नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सरकारने जाणून घ्यावे असा सल्ला विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर यांनी दिला आहे. या दुरुस्ती विधेयकाचे बहुतेक नेत्यांनी स्वागतच केले आहे.

एक काळ असा होता की, केवळ अशिक्षित आणि ग्रामीण भागात अंधरूढी आणि परंपरा आजही जिवंत आहेत असा समज होता. हा समज आता खोटा ठरला आहे. उच्चशिक्षित लोक मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धेच्या फेऱयात अडकतात अशी आजची परिस्थिती आहे. कर्नाटकातील अनेक जिल्हय़ात आजही मासिक धर्माच्यावेळी महिलांना गावाबाहेर झोपडीत ठेवण्याची प्रथा आहे. श्वान आणि संर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचार न करता एखाद्या मंदिरात त्यांना झोपविण्याची पद्धतही अनेक ठिकाणी पहायला मिळते. मुलांना रोगराई होऊ नये म्हणून एखाद्या मंदिरावरून त्यांना खाली फेकण्याची प्रथाही चालत आली आहे. जमिनीत पुरलेले गुप्त धन काढण्यासाठी नरबळीचे प्रकारही अधूनमधून घडतात. गेल्याच आठवडय़ात बेळगाव येथे दीड वर्षाच्या बालिकेचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न विफल झाला. यासाठी राज्यभरात अनेक मांत्रिक कार्यरत आहेत. बीदर, कोळ्ळेगाल येथील मांत्रिक तर मंत्र-तंत्र विद्येसाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुका जवळ आल्या की, राजकीय नेते अशा मांत्रिकांकडे पोहचतात. निवडणुकीत आपला शत्रू प्रभावी ठरू नये, आपलाच विजय व्हावा यासाठी तांत्रिक विधी करून घेतात. कर्नाटकातील अनेक बडे राजकीय नेते केरळमधील मांत्रिकांची मदत घेतात. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार आदी नेत्यांची नावे अशा प्रयोगांसाठी अधूनमधून चर्चेत असतात. केवळ ‘मंत्राने आंबा पाडवता येत नाही’ याची जाणीव असूनही मंत्र-तंत्राचे प्रयोग केले जातात. धर्माचरणाच्या नावाखाली होणारे असे अघोरी प्रकार समाजाला रसातळाला पोहचविणारे ठरतात. म्हणून अशा प्रकारांवर कायद्याने बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. अशा अघोरी आणि अंधश्रद्धा रुजविणाऱया प्रकारातील सहभाग सिद्ध झाला तर एकूण 7 वर्षे कारावास आणि 5 ते 50 हजार रु.पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा लागू झाला तर अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची सुटका होणार आहे.

सुंदोपसुंदी वाढतच चालली

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील सुंदोपसुंदी संपता संपेना अशी स्थिती आहे. काँग्रेस सोशल मीडिया टीमने ‘कर्नाटकात पुन्हा एकदा सिद्धरामय्या’ असा जोरात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे परमेश्वर पार संतापले आहेत. पुढची निवडणूक आम्हा दोघांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. कोण्या एकटय़ाच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवता येत नाही अशी भूमिका मांडत परमेश्वर यांनी ‘पुन्हा एकदा सिद्धरामय्या’ प्रचाराला आक्षेप घेतला आहे. कारण परमेश्वर स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धेत आहेत.

भाजपमध्ये येडियुरप्पा विरुद्ध ईश्वरप्पा असा संघर्ष आहे. बागलकोट जिल्हय़ातील तेरदाळ मतदारसंघात येडियुरप्पांनी निवडणूक रिंगणात उतरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  येडिंनी मात्र शिकारीपूरलाच आपली पसंती असल्याचे जाहीर केले आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी राजकीय नेत्यांमधील सुंदोपसुंदीही वाढत चालली आहे. विरोधकांपेक्षाही स्वकियांच्याच शत्रूभयाने अनेक राजकीय नेते हैराण आहेत. त्यांच्या मनातील बेचैनी वाढतच चालली आहे!

 

Related posts: