|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मृत्यूचे प्रयोजन

मृत्यूचे प्रयोजन 

अनेक युवकांचा देवावर विश्वास नसतानाही, मृत्यूनंतरही जीवन जगण्याचा आपल्याला अधिकार आहे असे वाटते. आपले असे अस्तित्व मृत्यूनंतरही वाचवायला देवाची काही गरज त्यांना वाटत नाही. पाश्चात्य देशातील विशेषतः पांढरपेशा आणि मध्यम वर्गीय अनेक युवकांना देवावर विश्वास ठेवायची गरज वाटत नाही. आपण कोणत्याही प्रकारे धार्मिक नाही आहोत असे ते आवर्जून सांगतात. पण त्याचबरोबर मृत्यू नंतरचे जीवन त्यांचे स्वागत करायला सज्ज आहे, एकप्रकारे आपण अमर आहोत यावरही त्यांचा प्रचंड विश्वास आहे. असे द्वंद्व कंसाच्याही मनात असेल काय?

मुळात मृत्यूचे या जगतात प्रयोजन तरी काय असावे? मुळात मृत्यूची आवश्यकता तरी काय? याचा निरंतर विचार मानवी मनाने केला आहे, तो काय आहे?

एक जीव प्रजाती म्हणून मृत्यू दूर सारणे आणि जगण्याचा, जिवंत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हे प्रत्येक जीवाचे जीवनाचे सर्वात मूलभूत ध्येय आहे. एखादी प्रजाती तोवरच जिवंत राहू शकते ती प्रजोत्पादन करेपर्यंत, आपल्या सारखाच दुसरा सुदृढ जीव निर्माण करेपर्यंत सुदृढपणे आजुबाजूचे पर्यावरण व परिस्थिती यांच्याशी मुकाबला करत किंवा जुळवून घेत जिवंत राहील. यासाठी मानवी जीवाचे पुनरुत्पादन ज्यातून होते तो काम हा पुरुषार्थ म्हणून आपल्या संस्कृतीनेही गौरविलेला आहे. जीवन सातत्यासाठी प्रजोत्पादन निरंतर आवश्यक आहे. हे निसर्गात दोन प्रकारे केले जाते. काही जीवांचे व वनस्पतींचे वारेमाप प्रचंड प्रमाणात पुनरुत्पादन होत असते. तेवढेच मृत्यूंचे प्रमाणही या प्रजातींत प्रचंड असते. मानवासारख्या प्रजातीत मात्र कमी मुलांना जन्म देऊन, त्यांचे योग्य ते संरक्षण, पालनपोषण करून त्यांना बराच काळ जगवावे लागते. तरच सुदृढ जीवाचे पुनरुत्पादन शक्मय होते.  मानवी जीवाचे संगोपन आणि संवर्धन ही दीर्घकाळ चालू असलेली प्रक्रिया असल्याने मानवी मेंदू इतका मोठा आणि मानवी मन इतके जटिल गुंतागुंतीचे व प्रगल्भही बनले आहे. पण काळ जसा पुढे जातो तसे वय वाढत जाते, शरीर थकत जाते, आयुष्य कमी होत जाते आणि मृत्यू जवळ येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया का घडते? कारण एका जीवनाला दुसऱया जीवनासाठी या पृथ्वीवर जागा खाली करून द्यावी लागते. वृक्षावरील एक पान पिकून गळून पडल्याखेरीज दुसरे पान त्याजागी उगवू शकत नाही. एका राजाने सिंहासन सोडल्याखेरीज दुसरा राजा त्यावर बसू शकत नाही. म्हणूनच निवृत्तीचा नियम आपण स्वीकारायला हवा. नवीन देहाला जागा निर्माण करून देण्यासाठी जुन्या देहाचे मरण अपरिहार्य आहे. मृत्यू हे जीवनाचे अपरिहार्य वास्तव ठरते ते याचसाठी!

याकरिताच आकाशवाणी झाल्यावर, मनाने बिथरलेल्या कंसाची समजूत घालताना वसुदेवाने त्याला सांगितले की-ज्याचा जन्म झाला आहे त्याचे मरण एक ना एक दिवस होणारच आहे. या देवकीला मारून टाकून तू अमर होणार आहेस का? थोडासा विचार कर.