|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » 2019 च्या निवडणुकीपूर्वी देशात आणीबाणी : रामदास फुटाणे

2019 च्या निवडणुकीपूर्वी देशात आणीबाणी : रामदास फुटाणे 

पुणे / प्रतिनिधी :

सध्याची परिस्थिती पाहता देशात 2019 च्या आधी आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते. पत्रकारांसह आपली मते मांडणाऱया अन्यांना आलेल्या नोटिसा ही त्याचीच मूळे असू शकतात, अशी भीती ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ उपक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे व सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. फुटाणे यांनी या वेळी जामखेड ते बर्लिनपर्यंतचा प्रवास उलगडलाच. त्यासोबत सामना चित्रपटाची निर्मिती, शिक्षक, वात्रटिकाकार, आमदार अशा विविध भूमिका तसेच राजकीय मंडळींचे किस्से आपल्या खास शैलीत सांगत तुफान फटकेबाजी केली.

ते म्हणाले, देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत असून, 2019 च्या निवडणुकीपूर्वी देशावर आणीबाणी लादली जाऊ शकते. पत्रकार व अन्यांना आलेल्या नोटिसा ही त्याचीच मुळे आहेत. अशाप्रकारच्या नोटिसा पाठवणे, ही वाईट बाब आहे. काँग्रेसने आणीबाणीत जनतेला अठरा महिने तुरुंगात ठेवले, भाजपचे सरकार 36 महिने तुरुंगात ठेवेल. त्यामुळे या सरकारला सद्बुद्धी मिळो. लोकशाही जिवंत राहो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

जातीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे वाटोळे

आताचे राजकारणही बदलले आहे. पूर्वीच्या राजकारणाला एक वैचारिक बैठक होती. आता ते उत्पन्नाचे वा संपत्ती कमावण्याचे साधन बनले आहे. सत्तेची भूक सर्व काळात सारखीच असते. मागची 30 वर्षे केवळ जात गोंजारण्यात गेली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे वाटोळे झाले. जात निर्मूलनाऐवजी जाती घट्ट होत आहेत. मंचावर फुले, शाहू, आंबेडकर नारा देणारे खाली येताच जातीय सूर आळवतात. प्रत्येक जातीचा नेता पक्षाला सांभाळावा लागतो. त्यातून राजकारणात अस्थिरता वाढत आहे. मतदारसंघात जातीची घरे किती, हा विचार केला जातो. देशापेक्षा धर्म, धर्मापेक्षा जात आणि जातीपेक्षा पोटजात महत्त्वाची झाली आहे. जात आणि धर्माच्या विरोधात बोलण्याची हिमंत कोणत्याही राजकीय पक्षात वा नेत्यात नाही. अशा प्रकारचे जातकेंद्रित राजकारणच देशाला मारक ठरते आहे, अशा शब्दांत त्यांनी राजकारणातील जातकारणावर निशाणा साधला.

कलाकार राजकारण्यांपासून दूरच बरा

मी कोणत्याही राजकीय नेत्याशी आर्थिक व्यवहार ठेवले नाहीत. त्यामुळेच राजकारण्यांवर लिहू शकलो. तशी राजकारण्यांशी होणारी मैत्रीही बऱयाचदा मारक ठरते. नाही म्हटले, तरी लिखाणात सॉफ्ट कॉर्नर येतो. म्हणून त्यांच्यापासून जरा लांब राहिलेलेच लेखक, कवीसाठी बरे पडते, असे मतही फुटाणे यांनी व्यक्त केले.

Related posts: