|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सर्व्हर डाऊनने उमेदवार हैराण

सर्व्हर डाऊनने उमेदवार हैराण 

ग्रामपंचायत निवडणूक

अखेरच्या दिवशी प्रचंड गोंधळ

अर्ज भरण्याची मुदत दिड तासाने वाढवली

प्रतिनिधी / रत्नागिरी

जिल्हय़ातील 222 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून दीड तासांनी वाढविण्यात आली होती. या गोंधळाच्या स्थितीमुळे जिल्हय़ात एकूण किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले याची नेमकी संख्या मिळू शकलेली नाही.

कोकण, पुणे, नागपूर विभागातील सर्व जिह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरताना संगणक प्रणालीमध्ये अनेक अडचणींचा उमेदवारांना सामना करावा लागला. अनेक ठिकाणी विविध पक्ष व उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. याची दखल घेवून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ शुक्रवारी 29 सप्टेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली होती. तरीही बहुतेक ठिकाणी गोंधळाचा स्थिती होती. त्यामुळे जिल्हाभरातून एकूण किती अर्ज दाखल झाले याची नेमकी आकडेवारी उशीरापर्यंत मिळू शकलेली नाही.