|Thursday, June 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘हलाल’मध्ये मुस्लीम स्त्रियांच्या व्यथेचा वेध

‘हलाल’मध्ये मुस्लीम स्त्रियांच्या व्यथेचा वेध 

सामाजिक जीवनातील स्थित्यंतराचे वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेण्यात आले आहेत. हलाल या आगामी मराठी चित्रपटातून मुस्लीम स्त्रियांच्या व्यथेचा वेध घेण्यात आला आहे. अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट 26 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यासारख्या अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटविलेल्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

विवाह व तलाक या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लीम स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने याचा परिणाम त्यांच्या भावनांवर कशा प्रकारे होतो याचे परखड चित्रण हलालमध्ये आहे. या चित्रपटाशी अनेक दिग्गज मंडळी जोडली  आहेत. लेखक राजन खान यांच्या हलाल कथेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी केली आहे.

मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारक लोकांपर्यंत पोचवता येतो. या उद्देशानेच मुस्लीम स्त्रियांची व्यथा हलाल चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना निर्माते अमोल कागणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींमधून सामाजिक प्रश्नांचा माणसांच्या जगण्याचा वेध घेतला आहे. समाज बदलतोय असं आपण म्हणतो पण खरंच समाज बदलतोय का? आजही अनेक समस्या व त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. दिग्दर्शक या नात्याने या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिला असल्याचे, शिवाजी लोटन पाटील यांनी यावेळी सांगितले. 

कथेचा आशय गडद करणारी मौला मेरे  मौला, सैयां ही दोन गीते व त्याला साजेसे पार्श्वसंगीत या चित्रपटातील गीतांना लाभले आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.