|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात श्री सदस्यांकडून शेकडो टन कचरा जमा

जिल्हय़ात श्री सदस्यांकडून शेकडो टन कचरा जमा 

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

रत्नागिरी शहर परिसरातून 200 टन कचरा संकलित

हजारोंच्या संख्येने श्री सदस्य झाले अभियानात सहभागी

 

प्रतिनिधी / रत्नागिरी

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरी जिह्यात सोमवारी सकाळी विविध भागातील शासकीय कार्यालय, मुख्य रस्ते व नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानात जवळपास साडेतीन हजार श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या मोहिमेंतर्गत रत्नागिरी शहरात 200 टन तर संपुर्ण जिल्हाभरातून एकूण सुमारे बाराशे टन कचरा संकलित करण्यात आला. श्री सदस्यांनी केलेल्या स्वच्छतेमुळे जिल्हा परिसर ‘स्वच्छ’ झाल्याचा दिसून आला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 सप्टेंबर रोजी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देवून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला रत्नागिरी शहर परिसरासह जिह्यात स्वच्छता मोहीम पार पडली. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत गत तीन वर्षापासून हे स्वच्छता अभियान सुरु आहे. भारत सरकारचे स्वच्छतादूत व प्रतिष्ठानचे श्रध्दास्थान पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान रत्नागिरी जिह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात श्री सदस्यांनी हिरीरिने राबवले. सामाजिक बांधिलकी व समाज ऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान विविध समाजपयोगी उपक्रम राबवून कार्यरत आहे. थोर समाजसुधारक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री बैठकीच्या माध्यमातून सुरु केलेल्या परमार्थाद्वारे निष्काम सेवेतून प्रतिष्ठानचे कार्य अखंड चालू असल्याचे दिसत आहे.

हजारो हात गुंतले स्वच्छतेत

सोमवारी सकाळी 7.00 वा. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला. यामध्ये हजारो श्री सदस्यांचे हात स्वच्छतेच्या कामात गुंतले होते. हातात झाडू घेवून परिसर चकाचक केला. विभागनिहाय विविध ठिकाणच्या बैठकीतील श्री सदस्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. स्वच्छतेवेळी ओल्या व सुक्या कचऱयाचे मूल्यमापन करण्यात आले. जमा झालेला कचरा त्या-त्या ठिकाणातील कचऱयाच्या व्यवस्थेनुसार पोहोचवण्यात आला. कचऱयाच्या डंपिंगसाठी श्री सदस्यांनी आपआपली वाहने आणली होती. यामध्ये डंपर, ट्रक, टेम्पोचा समावेश होता. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंढडमध्ये जमा झालेला कचरा टाकण्यात आला. श्री सदस्यांच्या उत्स्फूर्त कार्याचे यावेळी नागरिकांकडून कौतुक होत होते.
श्री सदस्यांचा हिरिरीने सहभाग

रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालय स्वच्छतेसाठी कर्लेकरवाडी, करबुडे, पाली बैठकीतील श्री सदस्यांनी सेवा बजावली. जिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छतेसाठी-कोतवडे, जिल्हा न्यायालयासाठीöपांढरा समुद्र, पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्यालयासाठी-समर्थनगर, विनम्रनगर, दारुबंदी व उत्पादन शुल्क कार्यालयासाठी-गणपतीपुळे, आरटीओ कार्यालयासाठी-सापुचेतळे, खंडाळा, बसस्थानकासाठी-चांदेराई, रेल्वेस्थानकासाठी-निवळी, खेडशी, भाटय़े समुद्रकिनाऱयासाठी-नाखरे, पावस, कोळंबे, मारुती मंदिर ते साळवी स्टॉपसाठी-असुर्डे ते टेंभ्ये, मारुती मंदिर ते बसस्थानकासाठी-कोट व कदमवाडीतील श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. रत्नागिरी शहरात 150 टन ओला व 50 टन सुका कचरा गोळा करण्यात आला. भाटय़े किनारील 1 किलोमीटर रस्त्याची साफसफाई करण्यात आली. रत्नागिरी शहरातील 18,7,156 क्षेत्रफळाची श्री सदस्यांकडून स्वच्छता झाली.

यावेळी शहर परिसरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, शासकीय कार्यालये, शाळा परिसर, बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, समुद्रकिनारा, रुग्णालय परिसर स्वच्छ करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोली, खेडमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. मात्र हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच मोलाचे असल्याचे जाणवले.

स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासीनता

या स्वच्छता अभियानात तहसील, पोलीस कार्यालय, स्वयंसेवी व सामाजिक संस्था सदस्य तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या अभियानात सरकारी कार्यालयातील कर्मचारी व नाग†िरकांनी पाठ फिरवल्याचे दिसले. ही उदासीनता ‘स्वच्छ व सुंदर शहरा’च्या स्वप्नास बाधक अशी बाब आहे. श्री सदस्यांच्या खांदाला खांदा लावून स्वच्छतेत झोकून देण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बाटल्यांचा खच

स्वच्छतेवेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बियर, दारुच्या बाटल्यांचा खच आढळला. जवळपास 2 ते 3 पोती बाटल्यांनी भरल्या होत्या. यावरुन या ठिकाण व्यवस्थेवर कुणाचेच नियंत्रण वा वचक नसल्याचा निदर्शनास आले. अलिकडे सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेल्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनेची मागणी होत आहे.

Related posts: