|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन 

पुण्यात घेतला अखेरचा श्वास : वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

पुणे / प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक आणि सव्यसाची संपादक ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने पुण्यात सोमवारी पहाटे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हमो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ह. मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथे झाला. ‘हमो’ या टोपण नावाने ते ओळखले जात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एमएपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पुढे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात ते स्थिरावले. साधना साप्ताहिकात 1969 साली प्रसिद्ध झालेली ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघुकादंबरीने ते प्रकाशात आले. ही कादंबरी 1972 साली पुस्तकरूपात आली. या कादंबरीचा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. हमोंची ‘काळेशार पाणी’ ही कादंबरीही वादग्रस्त ठरली. आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीवर अश्लीलतेचा आरोप झाला. त्यांचे बालकांड हे आत्मकथनही लोकप्रिय ठरले. हमो हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर लोकप्रभा, घरदार, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांतही त्यांनी काम केले. लोकप्रभा साप्ताहिकाला ऊर्जितावस्था आणून देण्यात त्यांचा मुख्य वाटा होता.

वाद, अटक अन् सुटका

चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही हमोंनी अर्ज भरला होता. मात्र, प्रचारपत्रकातील त्यांच्या जातीय भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला. जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्याचबरोबर अटकेनंतर लगेच त्यांची सुटकाही करण्यात आली. त्यानंतर हमोंनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे अध्यक्ष झाले. 

                                 विपुल ग्रंथसंपदा
 अण्णांची टोपी, आजची नायिका, इतिवृत्त, इतिहासातील एक अज्ञात दिवस, उलटा आरसा, एक माणूस एक दिवस, कलियुग, काळेशार पाणी, घोडा, चुनाव रामायण, ज्वालामुख, टार्गेट, द बिग बॉस, दिनमान, देवाची घंटा, न लिहिलेले विषय, न्यूज स्टोरी, बालकांड, पोहरा, बालकांड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा, मधलं पान, मार्केट, मुंबईचे उंदीर, माधुरीच्या दारातील घोडा, युद्ध, वीज, श्रीमंत श्यामची आई, सॉफ्टवेअर, स्वर्गसुखाचे, हद्दपार, आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी यांसह विविध पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. रंगभूमीवरील ‘दोन स्पेशल’ हे नाटक हमो यांच्या न्यूजस्टोरीवर आधारित आहे.

Related posts: