|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नगरपालिकेतील सत्ताधाऱयांना विकासकामांना भिडावेच लागेल

नगरपालिकेतील सत्ताधाऱयांना विकासकामांना भिडावेच लागेल 

युवराज निकम/ इस्लामपूर

इस्लामपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या सत्तेची वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. आणखी दिड-दोन महिन्यांनी वर्ष पूर्ण होईल. निवडीनंतर ते सत्कार-समारंभातून बाहेर पडतात, तोवरच पावसाळा सुरु झाल्याने मोठया विकासकामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. नागरीकांनी पालिकेत मोठया अपेक्षेने सत्तांतर घडवले आहे. यावेळी परतीच्या पावसाने उपनगरातील अनेक समस्यांचे विदारक चित्र पुढे आले. त्यामुळे पाऊस उघडताच प्रामुख्याने गटारी, रस्ते, स्वच्छता, वाहतूक नियोजन यांसह अन्य कामांकडे सत्ताधाऱयांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

इस्लामपूर नगरपालिकेतील 30 वर्षाहून अधिक काळची सत्ता नागरीकांनी उलथवली. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातही शहराचा बराच विकास साधला आहे. पण शहरातील लोक ‘कंपूशाही’ला कंटाळली होती. आणि नगराध्यक्ष पाटील यांच्या रुपाने तरुण, नवा चेहरा हा पर्याय नागरीकांना भावला. पण सत्ता काठावरील देवून शहरवासियांनी सत्ताधारी व विरोधकांची सत्वपरीक्षा घेतली. अस्थिर सत्तेमुळे नगराध्यक्ष भोसले-पाटील यांना सुरुवातीच्या काही सभा-बैठकांना कसरत करावी लागली. विरोधकांचा कडवा विरोध आणि स्वगटातील रुसवे-फुगवे यांतून स्थिरस्थावर व्हायलाच त्यांना सहा महिने जावे लागले.

भोसले-पाटील यांच्या सत्ताकाळातील भुयारी गटार योजनेला मंजूरी हे सर्वात मोठे काम आहे. यांसाठी काही रक्कम आमच्या काळातच आली, असल्याचा दावा राष्ट्रवादीचा आहे. सत्ता स्थिरावत असतानाच पावसाळा सुरु झाल्याने शहरातील विकास कामांना ‘खो’ बसला आहे. शहरातील गटारी, रस्ते, स्वच्छता, वाहतूक नियोजन हे प्रश्न जटील आणि वर्षानुवर्षे प्रलंबीत असणारे आहेत. पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी भुयारी गटार, 24ƒ7 पाणी योजना आणि रस्ते एकावेळी करण्याचे गाजर दाखवून तिन्ही कामे रखडवली. त्यामुळे खराब रस्त्याबद्धलच्या शहरवासियांच्या भावना तीव्र आहेत. आता भुयारी गटार योजनेची टेंडर प्रक्रिया व इतर मंजूरी मार्गस्थ आहेत. पावसाच्या उघडीपीनंतर हे काम सुरु झाल्यास पुन्हा पुढील काही वर्षे नागरीकांना शहरातून कंबर खिळखिळी करुनच फिरावे लागणार आहे.

शहरवासियांनी मोठया अपेक्षेने सत्तांतर घडवले आहे. नगराध्यक्ष पाटील हे पालिकेसाठी विकास आघाडीतून लढले. आणि महिन्यांतच ते भाजपावासी झाले. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने त्यांनी भरीव निधी आणून विकास कामांना भिडवे, अशी अपेक्षा साहजिकच नागरिकांची आहे. राज्यातील शासनाचे पश्चिम महाराष्ट्राकडे दूर्लक्ष आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पंधरा वर्षाच्या सत्ताकाळात भरीव निधी आणला. त्याच प्रमाणे नगराध्यक्ष पाटील यांनीही आपली ताकद वापरुन निधी आणणे आवश्यक आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फारच जवळ आहेत. त्याचा लाभ उठवून निधी आणणे सोयीचे आहे.

सध्या शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यांची अवस्था खराब आहे. रस्ते आणि गटार एकच बनल्याने खड्डयांचे साम्राज्य आहे. त्याचबरोबर उपनगरातील रस्ते व गटारींची स्थिती तर विदारक आहे. परतीच्या पावसाने हे विदारक चित्र दाखवून दिले आहे. खड्डयांत पाणी साठून राहील्याने शिवनगर परिसरात डेंग्यूची साथ पसरली. तर पाठीमागील काही महिन्यांत नळ कनेक्शनना गळती लागल्याने शास्त्रीनगर परिसरात कावीळीचे रुग्ण आढळले. शहरातील स्वच्छतेची घडी अद्याप बसलेली नाही. काही कचराकुंडी भरुन वाहतात. घंटागाडी वेळेत येतात, ही एक जमेची बाजू आहे. पण अजूनही स्वच्छतेच्या दृष्टीने बऱयाच सुधारणा होणे आवश्यक आहे.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न फार जूना आहे. पोलीसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेकडे कर्मचारी वाढले आहेत. त्यांनी आपल्या परीने वाहतूकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. मात्र पालिका प्रशासनाची त्यांना साथ हवी आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर कायमस्वरुपी अतिक्रमणे आहेत. पण व्यावसायिकांची तात्पुरती अतिक्रमणे, रस्त्यावर पडणारे बांधकाम साहित्य यामुळे रहदारीला अडथळा येत आहे. एकेरी वाहतूकीचे नियोजन नाही. पेठ-सांगली रस्त्यावर कोल्हापूर नाका येथे व अन्य ठिकाणी सिग्नल बसवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱयांनी घेतला होता. त्याचीही अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. वर्ष पूर्तीकडे जाताना, नगराध्यक्ष भोसले-पाटील व सहकारी नगरसेवकांना विकासकामांना भिडावेच लागेल.