|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एटीएम चोरीतील संशयित पेडणे पोलिसांच्या ताब्यात

एटीएम चोरीतील संशयित पेडणे पोलिसांच्या ताब्यात 

प्रतिनिधी/ पेडणे

आगरवाडा – पेडणे  आणि धारबांदोडा, उसगाव येथील एटीएम फोडून लाखो रुपये चोरी केल्याप्रकरणी फरार असलेल्या चोरटय़ांमधील दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पेडणे पोलिसांनी दिल्लीत जाऊन त्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन काल सोमवारी पेडणे पोलीस स्थानकात आणले आहे.

संशयित रुस्तम उर्फ सुहाग (30) व विनोद मावसीर सिंग (35) हे दोघेही एटीएम फोडण्यात पटाईत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयितांनी दि. 8 सप्टेंबर 2017 रोजी आगरवाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम उखडून पळविले होते. त्यासाठी त्यांनी पार्से येथे रस्त्याजवळ पार्क केलेली रिक्षाही (जीए 11 टी 1448) चोरली होती. रिक्षातून एटीएम मांद्रे भागातील बोडकीधेनू डोंगरावर नेऊन दगडांच्या आधारे मशीन फोडले व त्यातील 18 लाख 30 हजार रुपये लंपास केले होते.

पेडणे पोलिसांनी चोरीचा तपास करताना सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेऊन चोरटय़ांची माहिती इतर राज्यांना पाठविली होती. दिल्ली पोलिसांनी त्या आधारे प्रथम मावसीर सिंग याला अटक करुन त्याच्याकडून गुह्याची कबुली घेतली व नंतर रुस्तम उर्फ सुहाग याला अटक केली. त्यांच्याकडील रक्कम ताब्यात घेत गोव्यातील एटीएम चोरीप्रकरणाचा छडा लावला. दिल्ली पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधून संशयित चोरटय़ांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पेडणेचे उपनिरीक्षक अनंत गावकर, कॉन्स्टेबल ओमप्रकाश पाळणी, अनिशकुमार पोळजी, योगेश गावकर, स्वप्नील शिरोडकर, रुपेश हळर्णकर यांनी दिल्लीला जाऊन दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन पेडणे पोलीस स्थानकात आणले.

या प्रकरणातील पपू (30, गुडगाव – हरियाणा), खोकण (25), अमीर खान (32), छोटा सुमन (28) हे चारही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक उत्तर राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत गावकर व सहकारी अटक केलेल्या दोन्ही संशयितांकडून माहिती गोळा करीत आहेत.

 

Related posts: