|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नाथ पै सर्कलनजीक अपघातात महिला ठार

नाथ पै सर्कलनजीक अपघातात महिला ठार 

प्रतिनिधी / बेळगाव

भरधाव टाटाएसने धडक दिल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर रिक्षातील अन्य सहा जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नाथ पै सर्कलजवळ ही घटना घडली.

महादेवी विजय यकुंडी (वय 46, रा. बसवाण गल्ली, खासबाग) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर महादेवीला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

महादेवीचा पती विजय यकुंडी (वय 49), मुलगी दीपा (वय 9 वर्षे), वीणा नाईक (वय 50), विमल नाईक (वय 62, दोघीही रा. कलमेश्वर गल्ली, वडगाव)  यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रहदारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रात्री उशीरापर्यंत महादेवीच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. अन्य दोघा जखमींची नावे समजू शकली नाहीत. रहदारी दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.