|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नारुरला लिहिला गेला नवा इतिहास

नारुरला लिहिला गेला नवा इतिहास 

आदिवासी महिला गावच्या सरपंचपदी बिनविरोध

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गच्या इतिहासात मंगळवारी पहिल्यांदाच कातकरी आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱया वानरमारे समाजातील महिलेला सरपंच या नात्याने संपूर्ण गावाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली. तीही बिनविरोध. सौ. अलका रमेश पवार असे या महिलेचे नाव आहे. जंगल पायथ्याशी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणारी ही गरीब महिला नारुर कर्याद नारुर या ऐतिहासिक ओळख असलेल्या गावाची सरपंच बनली आहे. गाव पॅनेलतर्फे त्या सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. शिवसेनेतर्फे दाखल आणखी एका आदिवासी महिलेचा अर्ज छाननीत बाद ठरल्याने सौ. पवार बिनविरोध निवडल्या गेल्या.

 कुडाळ तालुक्यातील रांगणागडाच्या पायथ्याशी वसलेले नारुर कर्याद नारुर हे गाव. या गावात हे कातकरी आदिवासी गुण्यागोविंदाने राहतात. संपूर्ण नारुर गावाने त्यांना अभय दिलंय. या गावात शासनाने त्यांना पक्की घरे बांधून दिली आहेत. या वर्षी सरपंच पदाच्या आरक्षणात नारुरसाठी सरपंचपद आदिवासी महिलेसाठी राखीव आहे. कायम गावकुसाबाहेर राहिलेल्या या वानरमारे आदिवासींना आरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली.

या निवडणुकीसाठी गावाने बनविलेल्या ‘श्री देवी महालक्ष्मी, श्री देव खापरा, जयभवानी ग्रामविकास आघाडी’च्यावतीने ग्रामस्थांनी सौ. पवार यांची सरपंच पदाचा उमेदवार म्हणून निवड केली. शिवसेनेतर्फे अन्य एक महिला उमेदवार रिंगणात होती. छाननीमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने गाव पॅनेलच्या सौ. पवार यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. गाव पॅनेलच्या उमेदवाराला सरपंच पद मिळाल्याने नारुरवासीयांनी जल्लोष केलाच. पण त्याहीपेक्षा नारुरच्या आदिवासी बांधवांनी केलेला जल्लोष खूपच वेगळा होता. यावेळी उपस्थित प्रत्येक आदिवासीच्या चेहऱयावर आनंद झळकत होता. गाव पॅनेलच्यावतीने पं. स. माजी सदस्य व माजी सरपंच दीपक नारकर, या आदिवासींच्या उत्कर्षासाठी मोठी चळवळ उभी करणारे शोषित मुक्ती अभियानचे अध्यक्ष उदय आईर यांनी सौ. पवार यांचे अभिनंदन केले.

Related posts: