|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग रुंदीकरणाविरोधात कुवारबाव व्यापाऱयांचा कडकडीत बंद

महामार्ग रुंदीकरणाविरोधात कुवारबाव व्यापाऱयांचा कडकडीत बंद 

नागपूर-रत्नागिरीचे रूंदीकरण हाखंबापर्यंतच करण्याची एकमुखी मागणी

रुंदीकरणामुळे रोजगार हिरावण्याची भीती

740 व्यापारी, दुकानदारांचा संपात सहभाग

प्रतिनिधी /रत्नागिरी

नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हातखंबा ते साळवीस्टॉप परिसरातील व्यापारी, दुकानदार यांच्या मुळावर येणारे असल्याने हे रूंदीकरण हातखंब्यापर्यंतच व्हावे या मागणीसाठी कुवारबाव व्यापारी संघाने मंगळवारी कडकडीत बंद पाळला. साळवीस्टॉप ते पानवल दरम्यानचे 740 व्यापारी, दुकानदार यांनी या संपात सहभाग घेतला. या व्यापाऱयांनी कुवारबाव येथे रास्तारोको करत रॅलीही काढली. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्याध्यक्ष निलेश लाड यांनी यावेळी दिला.

हातखंबा ते रत्नागिरीतील मिऱया या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे नाचणे, साळवीस्टॉप, टिआरपी, कुवारबाव, मिरजोळे, पोमेंडी, खेडशी, पानवल या परिसरातील व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक, उद्योजक, तरूण बेरोजगार होण्याचा धोका असल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनिल साळवी यांनी सांगितले. ा आपले व्यवसाय, दुकाने सुरू करण्यासाठी या व्यापाऱयांनी बँकांकडून मोठ-मोठी कर्ज घेतली आहेत. रुंदीकरणामुळे येथील दुकानदार, व्यापाऱयांच्या मुळावर उठेल असे साळवी यांनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱयांच्या भावनांचा शासनाने गांभिर्याने विचार करण्याची मागणी त्यांनी केली.

या महामार्ग रुंदीकरणामुळे बाधित होण्याचे संकट उभे ठाकल्याने कुवारबाव व्यापारी संघाच्यावतीने मंगळवारी साळवीस्टॉप-कुवारबाव-खेडशी-पानवल दरम्यानच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा सामुहीक निर्णय घेतला होता. यामध्ये महामार्गालगतचे सर्व दुकानदार, व्यापारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. एकही दुकान यादिवशी उघडण्यात न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. चहाच्या टपरीपासून, सर्व किरकोळ, घाऊक, होलसेलर्स असे सर्वच व्यवसाय यादिवशी ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे या हा बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात आले.

शासनाला या बंदच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी मंगळवारी सकाळी कुवारबाव येथे मोठय़ा संख्येने व्यापारी, दुकानदार शासनाच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनिल साळवी, कार्याध्यक्ष निलेश लाड, सुधाकर सुर्वे, राजू तोडणकर, प्रताप सावंतदेसाई, प्रभाकर खानविलकर आदी पदाधिकाऱयांनी नेतृत्व केले. महामार्ग रुंदीकरणाविरोधात कुवारबाव येथे काही मिनिटे रास्तारोको करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी निदर्शने करत रास्तोरोको मागे घेण्यात आला. सर्व व्यापारी व दुकानदार यांनी यानंतर कुवारबाव बाजारपेठेतून करत जोरदार घोषणा देत जनजागृती रॅली काढली.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

शासनाने येथील व्यापाऱयांचा प्रकर्षाने विचार करूनच महामार्गाचे रुंदीकरण करावे. महामार्गाचे रुंदीकरण हे फक्त 30 मीटरचे करण्यात यावे. त्यामुळे येथील कोणत्याही व्यापारी वा दुकानदारांनाही त्याची मोठी झळ पोहचणार नाही. महामार्ग रुंदीकरण करायचे असेल तर ते हातखंबा ते नागपुर या महामार्गाचे करण्यात यावे. रत्नागिरी शहराचे मुख्य प्रवेशद्वार हे हातखंबा येथे व्हावे अशीही मागणी करण्यात आली. शासनाने येथील व्यापारी, दुकानदारांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.