|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबईकर श्रेयस अय्यरकडे ‘भारत अ’ चे नेतृत्व

मुंबईकर श्रेयस अय्यरकडे ‘भारत अ’ चे नेतृत्व 

न्यूझीलंड अ विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत अ व अध्यक्षीय संघ जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतीय ‘अ’ संघाबरोबर अध्यक्षीय संघाची निवड केली असून मुंबईकर श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी बीसीसीआयने पाच वनडे सामन्यासाठी दोन स्वतंत्र संघ निवडले आहेत. पहिल्या तीन सामन्यासाठी श्रेयसकडे नेतृत्वाची धुरा असणार असून किवीज संघाचे  अध्यक्षीय संघाबरोबर दोन सराव सामने होणार आहेत, या संघाचे नेतृत्व देखील श्रेयस भूषवणार आहे.

भारत व न्यूझीलंड अ संघात 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. पण, पाच सामन्यांसाठी दोन स्वतंत्र संघाची निवड करण्यात आली आहे. पहिल्या तीन सामन्यांत श्रेयस अय्यर तर शेवटच्या दोन सामन्यात रिषभ पंत संघाचे कर्णधारपद सांभाळेल. भारताविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघ मुंबईत दोन सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यासाठी देखील बीसीसीआयने अध्यक्षीय संघ जाहीर केला असून या संघाचे कर्णधारपद देखील श्रेयस अय्यर भूषवणार आहे. याशिवाय, दुलीप करंडक स्पर्धेत शतकी खेळी साकारणाऱया मुंबईकर पृथ्वी शॉची देखील संघात वर्णी लागली आहे. सराव सामन्यानंतर भारत व न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना 22 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होईल.

भारत अ संघ (पहिल्या तीन सामन्यांसाठी) – श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, दीपक हुडा, शुभम गिल, श्रीवत्स गोस्वामी, शाहबाज नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, सिध्दार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.

भारतीय अ संघ (अखेरच्या दोन सामन्यांसाठी)  रिषभ पंत (कर्णधार), ए.आर.ईश्वरन, प्रशांत चोप्रा, अंकित बावने, शुभम गिल, बाबा अपराजित, शाहबाज नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, सिध्दार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.

अध्यक्षीय संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिवम चौधरी, मिलिंद कुमार, रिषभ पंत, शाहबाज नदीम, करुण नायर, गुरकिरत मान, दीपक चाहर, धवल कुलकर्णी, जयदेव उनदकट व आवेश खान.

न्यूझीलंड अ विरुद्ध वनडे सामने – 6, 8, 10, 13 व 15 ऑक्टोबर (सर्व सामने वायएसआर स्टेडियम, विशाखापट्टणम).

न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने – 17 व 19 ऑक्टोबर, मुंबई.