|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वच्छतेच्या अभावाने साथीच्या रोगांची भीती

स्वच्छतेच्या अभावाने साथीच्या रोगांची भीती 

प्रतिनिधी / संकेश्वर

संकेश्वर शहरात केरकचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याने शहरात साथीचे रोग पसरल्याची माहिती पुढे आली आहे. दत्ता कडगावी या युवकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी मठ गल्ली परिसरात नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

कडगावी यांच्या निवासस्थानानजीक असणारी गटार पालिकेकडून वरचेवर स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे गटारीवरच झाडी वाढल्याचे चित्र पहायला मिळते. तसेच नजीकच्या अंतरावर नदी गल्लीला जोडणाऱया ओढय़ावर सेतू बांधण्यात आला आहे. पण या परिसराच्या स्वच्छतेकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी सेतू रस्त्याच्या दुतर्फा हागणदारीच केली असून सेतूचा संपूर्ण भाग झाडाझुडपांनी वेढला गेला आहे. यातच गल्ली भागातील केरकचरा मोठय़ा प्रमाणात आणून टाकला जातो. सांडपाणी, केरकचऱयाने डासांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी व डासांच्या वाढत्या प्रादूर्भावाने वेगवेगळ्य़ा साथीचे रुग्ण वाढल्याची चर्चा असतानाच दत्ताचा मृत्यू दुर्लक्षाचाच बळी ठरला का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक

पूर्वाश्रमीचे वॉर्ड क्र. 1 मधील नगरसेवक राजू बांबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पालिका कर्मचाऱयांना स्वच्छतेच्या दृष्टीने वारंवार सांगूनही ते याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या काळात मी माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मठ गल्ली परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका दिवसाने हा कचरा न संपणारा असल्याने ओढय़ाच्या परिसराची स्वच्छता राखणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. आपण स्वच्छतेच्या दृष्टीने अधिकची काळजी घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जागृती मोहीम हाती घेणार

स्वाईन फ्लूने युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. याविषयी तसा अहवाल आपण मागवित आहोत. स्वाईन फ्लू हा एकापासून दुसऱयाला जडणारा रोग असल्यामुळे शहरातील सर्वच भागात या रोगाबद्दलची जागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तथापि हा रोग गेल्या 8 वर्षापासून सर्वच ठिकाणी फैलावत आहे. मात्र नागरिकांनी या रोगाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने सरकारी इस्पितळात उपचार घ्यावे, असे आवाहन डॉ. डी. एम. दोडमनी यांनी केले आहे.

पालिकेकडून परिसराची स्वच्छता

मठ गल्ली परिसराचा संपूर्ण भाग जुने गाव असून या भागातील स्वच्छतेकडे अधिकचे लक्ष दिले जाते. कडगावी याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याच्या वृत्ताने पालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी परिसराच्या स्वच्छतेसाठी कर्मचाऱयांना पाठविण्यात आले आहे. आज सकाळपासून ओढा परिसरातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली आहे, असे पालिका मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सांगितले.

Related posts: