|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंगणवाडी कर्मचाऱयांना आणखीन एक संधी

अंगणवाडी कर्मचाऱयांना आणखीन एक संधी 

प्रशासनाने दिली 9 ऑक्टोबरची डेडलाईन

चाव्या जमा करण्याचे आदेश

जिल्हय़ातील 89कर्मचारी कामावर हजर

अंगणवाडी कर्मचारी-प्रशासन वाद चिघळणार

प्रतिनिधी / ओरोस :

तीन ऑक्टोबरच्या डेडलाईननुसार संपकरी अंगणवाडी कर्मचारी कामावर न हजर झाल्याने प्रशासनाने प्रशासकीय कारवाईचा पुढील बडगा उगारला आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्यासाठी दुसरी संधी देण्यात येत असल्याची नोटीस बजावण्यात आली असून हजर न झाल्यास चाव्या जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या नोटिसीबाबत कोणताच खुलासा न देणारे संपकरी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्यावर तीसऱया नोटिशीने काढून टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांना साडेदहा हजार रुपये मानधन मिळावे, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱयांच्या या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सेविकांच्या मानधनात दीड हजाराने वाढ करून ते साडेसहा हजार केले. मदतनीसांच्या मानधनात एक हजारने वाढ करुन ते साडेतीन हजार करण्यात आले. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन एक हजार 250 ने वाढवून ते साडेचार हजार करण्यात आले. त्याचप्रमाणे भाऊबीज भेटही एक हजारने वाढवून ती दोनहजार करण्यात आली. शासनाच्या या मानधन वाढीनंतर काही संघटनांनी संपातून माघार घेत कामावर हजेरी लावली. तर काही संघटना आपल्या मागणीवर ठाम असून अद्याप संपावर आहेत.

दरम्यान, शासनाने जाहीर केलेली मानधनवाढ 1 ऑक्टोबर 2017 पासून लागू होणार असल्याने 3 ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर व्हा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. अन्यथा प्रशासकीय कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

प्रशासनाच्या या कारवाईला न जुमानता जिल्हय़ातील बऱयाच अंगणवाडी कर्मचाऱयांनी अद्याप संप सुरुच ठेवला असून 5 ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱयांच्या या भूमिकेमुळे त्यांचा प्रशासनाबरोबरचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मात्र जि. प. अध्यक्षांनी या कर्मचाऱयांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर राज्य पातळीवर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भविष्यातील प्रशासन व संपकरी यांच्या भूमिकेकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या पहिल्या नोटिशीबाबतचा कोणताच खुलासा संपकरी कर्मचाऱयांकडून आला नसल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय कारवाईच्या पुढील टप्प्यातील दुसरी नोटीस बजावण्यात आली असून 9 तारीखपर्यंत कामावर हजर होण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपकरी कर्मचाऱयांनी अंगणवाडय़ांच्या आपल्याकडे ठेवलेल्या चाव्या जमा कराव्यात अन्यथा प्रशासनाची अडवणूक केल्याप्रकरणी व कामात अडथळा केल्याप्रकरणी वेगळय़ा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या संप मागे घेण्याच्या आवाहनानंतर संपात सहभागी झालेल्या कास्ट्राईब संघटनेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. तर अंगणवाडी कर्मचारी सभा व जीजाऊ संघटनेने मात्र संपातून माघार घेण्यास नकार दिला आहे. 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी जाहीर कलेल्या जेलभरो आंदोलनाची कोणतीही नोटीस जि. प. प्रशासनाला प्राप्त झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत जिल्हय़ातील 66 अंगणवाडय़ा सुरू झाल्या असून 89 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.  132 अंगणवाडय़ांमधून आहार सुरळीत झाला असून उद्यापासून ही संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: