|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेतविहिरीत बुडून गवारेडय़ाचा मृत्यू

शेतविहिरीत बुडून गवारेडय़ाचा मृत्यू 

एकाला जीवदान, सावंतवाडी शहरातील घटना

बचावलेला गवा बिथरल्याने पळापळ

सावंतवाडी :

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या गोविंद नाटय़मंदिरच्या मागील माडबागायतीमधील शेतविहिरीत पडलेल्या दोन गवारेडय़ांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱयाला वनविभागाच्या मदतीने जीवदान मिळाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. घटना समजताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बचावलेला रेडा दोरखंडाने बांधूनही आक्रमक झाल्याने वनकर्मचाऱयांची, नागरिकांची पळापळ झाली. अखेर नागरिकांना तेथून बाजूला करण्यात आले. तब्बल पाच तासानंतर त्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले.

गोविंद नाटय़मंदिरामागील माडबागायतीत शेतविहीर आहे. त्यात दोन गवारेडे पडल्याचे तेथे म्हशींना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महेश गवळी यांच्या नजरेस पडले. त्यांनी तातडीने याबाबत नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर अमित भराडी, हुसेन इसाक शेख, महम्मद करोल, सावळाराम गवळी, महेश गवळी, अजय जाधव, वनरक्षक बबन रेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरपालिका व वनविभागाला माहिती देण्यात आली. पाहणीअंती शेतविहिरीत दोन गवारेडे दिसले. त्यातील एक मृतावस्थेत तरंगत होता. तर दुसरा पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. वनकर्मचाऱयांनी दोरखंड आणून जिवंत गव्याला बाहेर काढून जीवदान दिले. मात्र, बिथरलेला हा गवा आक्रमक झाला. दोरी तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर जाड दोरखंड आणून बांधण्याचाही प्रयत्न केला. तर विहिरीत मृत झालेल्या गवारेडय़ाला बाहेर काढण्यात आले. वनक्षेत्रपाल विजय कदम, वनपाल अ. भा. कटके, अमिर कातकीकर, प्रमोद जगताप, विशाल पाटील, संतोष मोटे, सी. व्ही. धुरी, बबन रेडकर, प्रताप परब, शिंदे, गोविंद केंद्रे आदी 15 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तैनात ठेवले होते.

                          गव्याचा पळण्याचा प्रयत्न

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गवारेडय़ांचा कळप विहिरीत पडल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळ आडवाटेवर तसेच झुडपात असल्याने तेथे जागाही कमी होती. मात्र, गव्यांना पाहण्यासाठी तसेच फोटो घेण्यासाठी झुंबड उडाली. आवाजामुळे गवारेडा दोरी तोडून, हिसकावून पळण्याचा
प्रयत्न करत होता. अचानक रेडय़ाने गर्दीच्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळतांना तेथील घराच्या छपराचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. अखेर वनविभाग व पोलिसांनी नागरिकांची गर्दी पांगवली. पाच तासानंतर गवारेडय़ाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

                           भरवस्तीत गवारेडे

गेल्या काही महिन्यापासून कोलगाव, भटवाडी, बाहेरचावाडा, कारिवडे भागात गवारेडय़ांच्या कळपाचे वास्तव्य होते. गवे शेती बागायतीचे नुकसान करत असल्याने शेतकरी संकटात सापडले होते. गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱयांनी वनविभागालाही घेराव घालत जाब विचारला होता. मात्र, कळपातील दोन गवे विहिरीत पडल्याचे समजताच पाहण्यासाठी गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी विहिरीत गवारेडे पडले तो भाग बाहेरचावाडा येथील भरवस्तीत आहे. त्यामुळे अजूनही नागरिकांच्या मनात भीती आहे. सायंकाळी उशिरा मृत गवारेडय़ाचा पंचनामा करून त्याचे दफन करण्यात आले.

Related posts: